Sanjay patil vs Chandrahar patil : सांगली... ऐतिहासिक वारसा असलेलं शहर... पहिलं मराठी नाटक सादर करणारे विष्णूदास भावे यांची नाट्य पंढरी... तंतुवाद्यांचं माहेरघर... श्री क्षेत्र औदुंबर, प्राचीन गणपती मंदिर, अरेवाडीचं विरोबा मंदिर, हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेलं मिरजेचा मिरासाहेब दर्गा ही इथली श्रद्धास्थानं... हळद, बेदाणा, द्राक्षांसाठी सांगली ओळखली जाते... संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी... चारवेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या वसंतदादा पाटलांची सांगली.. लोकनेते राजारामबापु पाटील, पतंगराव कदम, आर आर आबा पाटील अशा अनेक नेत्यांमुळं सांगली नेहमीच राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलं. मात्र तरीही चांगली म्हणावी, अशी सांगलीची स्थिती नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली झाली का चांगली?


सांगली जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जत, आटपाडीत अजूनही टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतो. म्हैसाळ, टेंभू सिंचन योजना अजूनही अपूर्ण आहे. कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय. कृष्णा नदीला येणा-या महापुरामुळे निर्माण झालेला पूरपट्टा आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. नव्या एमआयडीसी मंजूर होऊनही त्या विकसित झाल्या नाहीत. हळद, बेदाणा, द्राक्षावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले गेले नाहीत. नाट्य पंढरी असलेल्या सांगलीत सरकारच्या माध्यमातून एकही नाट्यगृह उभं राहिलं नाही.


सांगलीचं राजकीय गणित


राजकीयदृष्ट्या सांगली म्हणजे काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला... 2009 मध्ये काँग्रेसच्या प्रतीक पाटलांनी अपक्ष उमेदवार अजित घोरपडेंचा 39 हजार मतांनी पराभव केला. मात्र, 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचं कमळ फुललं... भाजपच्या संजयकाका पाटलांनी काँग्रेसचे तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटलांचा सव्वा दोन लाख मतांनी पाडाव केला. 2019 मध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढतीत संजयकाकांनी स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना मात दिली. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार निवडून आला होता.


भाजपनं संजयकाका पाटलांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवलंय. त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असतानाही उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी झाले. तर दुसरीकडं महाविकास आघाडीत उमेदवारीवरून जोरदार धुसफूस आहे. शिवसेना ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना सांगलीच्या आखाड्यात उतरवलंय. मिरजमधील सभेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली, तर वसंतदादा पाटील घराण्याचे वारसदार विशाल पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काहीही झालं तरी सांगलीतून काँग्रेसच लढणार असल्याचं ठामपणं सांगितलं जातंय.


दरम्यान, भाजपनं प्रचारात आघाडी घेतलीय.. तर उमेदवार ठरवतानाच महाविकास आघाडीला घाम फुटलाय. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस, अशी कुस्ती रंगलीय. संजयकाका पाटलांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना शड्डू ठोकून आखाड्यात उतरवलंय. तर काँग्रेस अजून मागे हटायला तयार नाही. दोघांच्या या भांडणात संजयकाकांना लाभ तर होणार नाही ना? असा सवाल विचारला जात आहे.