पुणे : बहिणीसाठी भाऊ काहीही करायला तयार होतो. राजकारणही याला अपवाद नाही. बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ. सुप्रिया सुळेंना कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. बहिणीच्या प्रेमापोटी या अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या सोबतच्या वैराला मूठमाती दिली. बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल असा सामना आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली तरी इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारापासून काँग्रेसचे कार्यकर्ते चार हात लांब होते. पुरंदर, भोर आणि वेल्ह्यातही हीच स्थिती होती. या परिस्थितीला कारणीभूत होता तो हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष. २०१४चा अनुभव पाहता सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी यावेळी कोणताही धोका पत्करण्यास तयार नव्हत्या. त्यामुळंच अजित पवारांनी थेट हर्षवर्धन पाटलांचं पुण्यातलं घर गाठलं आणि हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करुन इंदापुरातला वाद मिटवला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अजित पवारांनीही या प्रकरणी सामंजस्याची भूमिका घेतली. हर्षवर्धन पाटील जेव्हा बोलवतात तेव्हा जेवायला येतो असं सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने आतापासून विधानसभेची सोय लावण्याचा प्रयत्न केला. पण या मनोमिलनामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या राजकीय भवितव्याचे काय, असा प्रश्न निर्माण झाला.