पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुण्यामध्ये भाजपाने मिशन लाभार्थी हाती घेतले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींपर्यंत पोहोचण्याची योजना पक्षातर्फे राबवण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांतून या प्रश्नांची उत्तरे मिळायला एखाद वेळ उशीर लागू शकतो. पुणे शहर भाजपकडे मात्र ही यादी तयार आहे. केंद्र सरकारच्या म्हणजेच मोदी सरकारने घोषित केलेल्या विविध योजनांची इत्यंभूत माहिती पक्षाकडून गोळा करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील किती लोकांना आयुषमान भारत योजनेचा लाभ झाला, किती जणांना मुद्रा बँक योजनेतून व्यवसायासाठी कर्ज मिळाले, उज्वला गॅस योजना किती घरांपर्यंत पोहोचली  आहे. आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळालेल्यांची संख्या किती आहे. याची माहिती घेण्यात येत आहे.पुण्यातील सुमारे साडेचार लाख नागरिकांना गेल्या ४ वर्षांत या योजनांचा लाभ मिळाला असल्याचा पक्षाचा दावा आहे. आता या सगळ्या लाभार्थींशी संपर्क साधण्याची मोहीम पक्षातर्फे हाती घेण्यात आली आहे. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तसंच लोकप्रतिनिधी घराघरांत जाऊन लाभार्थींशी संवाद साधणार आहेत. विरोधकांनी मात्र भाजपच्या या मोहिमेवर टीका केली आहे. 


लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. भाजप सरकारने घोषित केलेल्या योजना फसव्या असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. अशावेळी, 'हा घ्या पुरावा' ची रणनीती भाजकडून अवलंबण्यात आली आहे. जोडीला लाभार्थ्यांच्या मतांचा लाभ करून घेण्याचा प्रयत्नही आहे.