जालना : लोकसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात समोरा-समोर आलेत. 2014 च्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार शरदचंद्र वानखेडे यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यावेळी जालना मतदार संघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष असल्याने जालना मतदार संघातील लढतीकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. या आधी सलग दोन वेळा आमदार आणि सलग चार वेळा खासदार राहिलेले दानवे पुन्हा लोकसभेत जाण्याची तयारी करत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जालना शहरातून रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले. मात्र आता मागच्या वेळेसारखी मोठी लाट नसल्यामुळे दिवसभरात राज्यातला प्रचार आणि संध्याकाळी मतदारसंघात, असे वेळापत्रक दानवेंनी बनवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 च्या लोकसभा निवडणुकीत दानवेंसमोर विलास औताडेंचंच आव्हान होते. त्यावेळी दानवे यांना 5 लाख 91 हजार 428, विलास औताडे यांना 3 लाख 84 हजार 630 तर बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवलेल्या डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना 23 हजार 719 मतं मिळाली होती. यंदाही या तिघांमध्येच लढत होणार असली तरी भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार आहे. गेल्या 5 वर्षात राज्य आणि केंद्र सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्याचा दावा औताडे यांनी केला असून आपणच विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र स्थानिक नेत्याला काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान औताडेंसमोर आहे. 


डॉ. वानखेडे यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र औरंगाबाद बसपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे यांनीही सपा-बसपा आघाडीकडून रिंगणात उडी घेत वानखेडेंची वाट बिकट केली आहे. या लोकसभा निवडणुकीत जालन्यात 20 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर झाल्यामुळे दानवेंचा मार्ग थोडा प्रशस्त झाला असला तरी लढाई अटीतटीची होणार, असंच चित्र आहे.