loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांकडून उमेदवारी जाहीर द्यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये कोणाची लॉटरी लागली तर कोणी नाराज झालाय. सर्वच पक्षांमधील नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. सध्या शिवसेना शिंदे गटातील यवतमाळ-वाशीम येथील लोकसभेची जागा उमेदवारीमुळे चर्चेत आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्या यवतमाळ-वाशीम लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेच्या पाच वेळा खासदार राहिल्या आहेत. भावना गवळींवर अनेक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर गवळींविरोधात मतदारसंघात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.


आयकर विभाग आणि ईडीची ससेमिरा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यामागे आयकर विभाग आणि ईडीची ससेमिरा आहे. संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवल्याची बातमी समोर आली होती. तब्बल 8 कोटी 26 लाखांचा टॅक्स थकवल्याप्रकरणी आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील बांधकाम विभाग आणि देगाव येथील कार्यालयाची ईडीकडून चौकशी सुरु होती.  ईडीकडून भावना गवळी यांचे निकटवर्तीय असलेल्या सईद खान यांना अटक करण्यात आली. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सईद खान हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत. या सर्व प्रकरणांचा परिणाम भावना गवळींच्या संभाव्य उमेदवारीवर झालाय का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


शिवसेना-भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार भावना गवळी यांच्याविरोधात जनतेमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जाते. हेदेखील भावना गवळींचे तिकिट कापले जाण्यामागचे महत्वाचे कारण ठरु शकते. 


दुसरीकडे संजय राऊत यांच्यासोबतच्या मिटींग वाढू लागल्या आहेत. ते महायुतीचे यवतमाळ वाशिम येथील प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे महायुतीच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.