लेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट
Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.
जावेद मुलानी, झी मीडिया बारामती : शरद पवारांनी (Sharad Pawar) तब्बल 55 वर्षांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतली. मात्र यामागे आहे शरद पवारांचं आपल्या लेकीसाठी असलेलं प्रेम. बारामती लोकसभेच्या रणांगणात यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळतोय. शरद पवारांची लेक म्हणजे सुप्रिया सुळेंविरोधात (Supriya Sule) पवारांचीच सून म्हणजे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या ठाकल्या आहेत. अजित पवारांचं बारामतीमधलं वर्चस्व पाहता नणंद-भावजयीमधली लढाई सुप्रिया सुळेंसाठी वाटते तितकी सोपी नाही. म्हणूनच शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघांमधल्या आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसोबतही जुळवून घेताना दिसतायत.
पवार-काकडे संघर्ष
पवार आणि काकडेंचा संघर्ष राजकारणात सर्वांनाच ठावूक आहे. काकडेंच्या संघर्षातूनच शरद पवारांचा बारामतीत राजकीय उदय झाला. पवारांआधी बारामतीत काकडे कुटुंबियांचं प्रस्थ होतं. मात्र शरद पवारांनी काकडे कुटुंबियांना शह देत बारामतीत आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. पवारांचे राजकारणातले प्रतिस्पर्धी अशी काकडेंची ओळख आहे. जिल्हा परिषदेपासून ते सहकारी साखर कारखाने, बाजार समिती, पतसंस्था अशा सर्वच ठिकाणी काकडे कुटुंबियांनी पवारांविरोधात लढा दिला. त्यामुळे पवार आणि काकडे एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते..
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या 5 वर्षांपासून काकडे कुटुंबियांशी जुळवून घेतलं होतं. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर अजित पवारांनी संधी दिली. आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी नेमकी हीच बाब हेरली.
पक्षबांधणीसाठी आणि विशेष करुन लेकीसाठी शरद पवार बारामतीतल्या जुन्या कुटुंबियांच्या भेटी घेताना दिसतायत. जुने मतभेद मिटवून परत एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. मार्चमध्ये शरद पवारांनी 25 वर्षांनंतर कट्टर विरोधक अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. त्यानंतर 1997 मध्ये साथ सोडलेल्या चंद्रराव तावरेंचीही भेट घेतली..
काकडे कुटुंबातले सतिश काकडे अजित पवारांसोबत आहेत.. तेव्हा इतर काकडे कुटुंब काय भूमिका घेणार? काकडे कुटुंब शरद पवारांच्या बाजुने जाणार की अजित पवारांना साथ देणार? की शरद पवारांनी घेतलेल्या भेटींचा त्यांची लेक सुप्रिया सुळेंना फायदा होणार हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल. कारण, बारामती लोकसभा मतदारसंघातली लढाई ही फक्त नणंद आणि भावजयीमधली लढाई नाही.. तर काका आणि पुतण्याच्या राजकीय भवितव्याची निवडणूक आहे..