LokSabha: महायुतीला 45 च्या पुढे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरातील सभेत सुधीर मुनगंटीवार यांचं तोंडभरुन कौतुक करताना जनतेला त्यांना रेकॉर्ड मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपा फॉर्म भरण्याची सुरुवात करत आहे. सुरुवात चांगली झाल्यास अंतही चांगला होतो असं यावेळी ते म्हणाले. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात लढत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ही राज्याची नव्हे तर देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल, नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक सुधीरभाऊ आणि काँग्रेस यांच्यातील नाही. ही निवडणूक देशात मोदींचं राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची याचा निर्णय करणारी आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 


"सुधीर मुनगंटीवारांना दिलेलं मत हे नरेंद्र मोदींना दिलेलं मत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत राहुल गांधींना असेल. राहुल गांधींची अवस्था काय आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. ते एक यात्रा घेऊन निघाले आणि जिथे गेले तिथे काँग्रेस फुटली, लोक सोडून गेले आणि निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तुम्ही आता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तर नरेंद्र मोदी हे एकच नाव ऐकू येतं," असं ते म्हणाले.


पुढे ते म्हणाले की, "आज देशाला नरेंद्र मोदींमुळे असं नेतृत्व लाभलं आहे ज्यांनी सर्वात आधी गरिबांचा विचार केला. त्यांना घऱ, शौचालय, गॅस, कर्ज दिलं. जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदींनी करुन दाखवलं. 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. जे जगाला जमलं नाही ते मोदींनी देशात केलं. मोदींचं सरकार मूठभर लोकांसाठी काम करणारं नाही. शेतकरी, ओबीसी, अल्पसंख्यांक प्रत्येकाला हे आपलं सरकार असून, आपल्यासाठी काम करत असल्याची भावना मिळत आहे". 


"महायुती भक्कम झाली आहे. अनेक पक्ष आपल्यासोबत आहेत. चंद्रपूरमध्ये तर सुधीरभाऊंसारखा उमेदवार दिला आहे. ते वकृत्व, कर्तृत्व, नेतृत्व याचा तिहेरी संगम आहे. त्यांनी गेले 30 वर्षं महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधात असताना सरकारला करो की पळो करुन सोडलं. सत्तेत आल्यावर सत्तेत काय परिवर्तन घडवू शकतो हे जनतेला दाखवलं. 50 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करत महाराष्ट्राला हिरवंगार करण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. आज संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रात जंगल वाढलं, हे त्यांच्यामुळे झालं.  त्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाच्या पूर्ततेनिमित्त अफजल खानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणली. आमच्या अस्मितेच्या मानकांसाठी त्यांनी काम केलं," असं कौतुक त्यांनी केलं. 


"चंद्रपूरचा चेहरा बदलला आहे, विकास झाला आहे. मोदींच्या सरकारमध्ये आणि नितीन गडकरींच्या नेतृत्वात विदर्भाचा चेहरा बदललेला दिसत आहे. भाजपा, महायुती वगळता कोण हा विकास करु शकतं? विकास करायचा असेल तर दृष्टी लागते. सर्व समाजाला सोबत घेऊन चालावं लागतं. दु:ख समजून घ्यावं लागतं. अशावेळी मनात सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय दुसरं नाव येऊच शकत नाही," असं ते म्हणाले. रेकॉर्ड मताने जागा निवडून आणायची आहे असं आवाहनही त्यांनी केलं.


महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात करण्यासाठी आम्ही चंद्रपूरची निवड केली. सुरुवात चांगली झाल्यास अंतही चांगला होतो. आपल्याला 45 च्या पुढे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.