सरफराज सनदी, झी मीडिया, सांगली :  सांगलीत काँग्रेसतर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमाला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी हजेरी लावली आणि एकच चर्चा रंगली. विशाल पाटील आहेत यांनी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून रिंगणात उतरून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आणि ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना आव्हान दिलं होतं. आता तेच विशाल पाटील काँग्रेसच्याच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस-ठाकरे गट आमने सामने
विशाल पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी ठाकरे गटाने केलीय. त्याआधी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेसला इशारा दिला होता. जर कोणी बंडखोरी करत असेल तर त्या त्या पक्षानं त्या थांबवाव्यात, गद्दारी थांबवणं त्या पक्षाची जबाबदारी आहे, असे ठाकरेंनी म्हटलं होतं.  तर कार्यकर्ते रिचार्ज व्हावेत म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं अशी सारवासारव काँग्रेसने केलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर ठाकरे गटावरच शरसंधान साधलंय. ठाकरे गटाने सांगलीच्या पाणीटंचाईवर बोलावं असा सल्ला पटोलेंनी दिलाय.


लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर विशाल पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी ठाकरेंनी केली होती. मात्र तशी कारवाई झाली नाही. आता तेच बंडखोर विशाल पाटील काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजर राहिले.. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस विशाल पाटील यांच्या मागे उभी होती का असा सवाल ठाकरे गटाने केलाय.


विशाल पाटील यांची बंडखोरी
पश्चिम महाराष्ट्रील राजकारणाचं केंद्रस्थान असलेला सांगलीचा किल्ला कोण राखणार? असा सवाल विचारला जात होता. ठाकरे गटाने बाजी मारली खरी पण तिकीट न मिळाल्याने विशाल पाटील यांनी दंड थोपटले होते. काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे सांगलीत भाजपाचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिहेरी लढत रंगली.