पंकजा मुंडे `चौकीदार` नाहीत
पंकजा मुंडे यांनी अद्याप आपल्या ट्विटर अकाऊंटवर `चौकीदार` शब्द आपल्या नावापुढे लावला नाही.
मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजकीय पक्षांच्या प्रचार फेऱ्या आणि कॅम्पेनिंगला जोरदार सुरूवात झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने 'अच्छे दिन आयेंगे'चे कॅम्पेन प्रभावीपण राबवले. त्याचा रिझल्टही त्यांना निवडणूकीत मिळाला. 2019 ची लोकसभा निवडणूक ही 'चौकीदार' या शब्दावर रंगताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील नावासमोर चौकीदार लिहिल्यानंतर भाजपाच्या प्रत्येक नेत्यानेही हा ट्रेण्ड फॉलो केला आहे. सुष्मा स्वराज, नितीन गडकरी, अरुण जेटली, स्मृती इराणी अशा जवळजवळ सर्वच नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार बिरूद लावले आहे. राज्यांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, पुनम महाजन, रावसाहेब दानवे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही चौकीदार बिरूद पाहायला मिळत आहे. पण याला महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा अपवाद पाहायला मिळत आहे.
पंकजा मुंडे यांनी अद्याप आपल्या ट्विटर अकाऊंटवर 'चौकीदार' शब्द आपल्या नावापुढे लावला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे एका सभेत सांगितले होते. त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी समाचार घेतला. राहुल गांधी, कन्हय्या कुमार यांनी आपल्या भाषणांमध्ये 'चौकीदारही चोर है' असे म्हटले. त्यानंतर 'चौकीदारही चोर है' हे सोशल मीडियात ट्रेण्ड व्हायला लागले. भाजपा सरकारने न पाळलेल्या आश्वासने समोर आणत विरोधकांनी 'चौकीदारही चोर है' हे वाक्य हॅशटॅग सहीत देशभरात पसरवले.
राफेल प्रकरणात तर याला आणखी जोर मिळाला. अंबांनींचा सहभाग, फाईल गहाळ याप्रकरणांनंतरही 'चौकीदारही चोर है' या वाक्यावर राहुल गांधी यांनी जोर दिला. पण हा प्रचार हाणून पाडण्यासाठी भाजपाच्या आयटी सेलने नवी शक्कल लढवलेली पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्दप्रयोग केला. त्यानंतर भाजपाच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी आपल्या नावांच्या पुढे चौकीदार लावले आहे. त्यांना फॉलो करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आपल्या नावापुढे चौकीदार शब्द लावला आहे. पंतप्रधान मोदी 500 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरंस घेऊन 'मै भी चौकीदार' कॅम्पेन चालवणार आहेत.