अहमदनगर : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजन यांने भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली होती. राधाकृष्ण विखे पाटल यांनी राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे-पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला आहेत. तसेच नगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे अहमदनगरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात टीका केली होती. विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते.  


काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अहमदनगरमध्ये चर्चा रंगत होती. कारण त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राधाकृष्णही भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेत राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोदींपासून काही अंतर राखले होते. 



दरम्यान, त्यांनी येत्या तीन-चार दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचे विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवला होता. विखे यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनताई विखे पाटील मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपचे नगरमधील उमेदवार सुजय विखे यांचा उघडपणे प्रचार करत होत्या. त्यामुळे विखेंची अडचण अधिक वाढली होती. तसेच काँग्रेसने विखे पाटील यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले होते. 


दरम्यान, भाजप प्रवेशाबाबत झी 24 तासच्या प्रतिनिधीने याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता विखे पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसून पूर्वीही अशा चर्चा होत राहिल्या असल्याचे सांगितले. मात्र राहुल गांधींच्या विदर्भातील दोन्ही निवडणूक सभांना विखे गैरहजर होते. तसेच - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची काँग्रेसची एकही सभा विखे पाटील यांनी अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम कायम होता. आता तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. तो काँग्रेसने स्वीकारला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.