मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुलगा सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश टाळता येत नसल्यानं विखे पाटलांसमोर अडचण निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच नैतिकतेचा प्रश्न म्हणून पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सुजय विखे आज दुपारी एक वाजता वर्ष या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत नगरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून विखेंनी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादीने जागा न सोडण्याची भूमिका कायम ठेवलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील आज दुपारी १ वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अहमदनगर मतदारसंघातून ते भाजपाचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे.


दरम्यान, सुजय विखे यांचा भाजपा प्रवेश रोखण्यासाठी राधाकृष्ण विखेंनी आपलं सर्व अस्तित्व पणाला लावलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली.  विखें पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, या सगळ्या प्रयत्नांना अपयश आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज सुजय विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झालंय.