दीपाली जगताप-पाटील, झी २४ तास, मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहचलाय. राजकीय हेवेदावे सुरु आहेत. पण या राजकीय लढाईत राजकीय लढाईत महिला उमेदवारांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. राज्यात ८ कोटी ७० लाख मतदार आहेत. यापैंकी पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ५० लाख आहे तर महिला मतदार ४ कोटी २० लाख आहेत. या आकडेवारीनुसार राज्यात जवळपास ५० टक्के मतदार महिला आहेत. मात्र, लोकसभेची उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आखडता हात घेतलेला दिसतो. राज्यात सर्वात जास्त महिला उमेदवार भाजपानं दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा राज्यात २५ जागा लढवत आहे. त्यापैंकी सात महिलांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसही २५ जागा लढवत असताना उमेदवारी मात्र, केवळ तीन महिलांना देण्यात आलीय. राष्ट्रवादीच्या १९ जागांपैकी केवळ एक महिला उमेदवार आहे. तर शिवसेनेनंही २३ पैकी केवळ एका महिलेलाच तिकीट दिलंय. 


भाजपाच्या महिला उमेदवार सर्वाधिक असल्या तरीही पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांना हेदेखील अपुरं वाटतंय... पक्षानं अधिक महिलांना संधी द्यायला हवी होती, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. 


संसदेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावं, असं सगळेच राजकीय पक्ष आक्रमकपणे मांडत असतात. मात्र, प्रत्यक्षात तिकीट द्यायची वेळ आली की या भूमिकेकडे सोयीस्कर काणाडोळा केला जातो, हेच यंदाच्या निवडणुकीतही सिद्ध झालंय.