मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसचे वादग्रस्त नेते संजय निरूपम यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. याजागी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांची याठिकाणी वर्णी लागली आहे. मिलिंद देवरा हे काँग्रेस घराण्याशी निष्ठावंत असणाऱ्या मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. एक सुशिक्षित आणि संयमी नेतृत्व म्हणून काँग्रेस हाय कमांडला त्यांच्याकडून आशा आहेत. त्यामुळे काँग्रेस अडचणीत असताना हाय कमांडने मोठा विश्वास मिलिंद देवरा यांच्यावर दाखवला आहे. नवनिर्वाचित मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा हे जुन्या-नव्यांना सावरून घेण्याच्या भूमिकेत आहेत. त्यांनी माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर देखील वक्तव्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


संजय निरुपम माझे मोठे भाऊ तसेच मित्र आहेत असे वक्तव्य मिलिंद देवरा यांनी केले आहे. निरुपम यांच्याशी माझे कालही बोलणे झाले, आजही बोलणे झाले आहे. आम्ही सर्व एकत्र येऊन काम करणार असल्याचा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला आहे. मला मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावर नियुक्त केल्याबद्दल देवरा यांनी राहुल गांधींचे आभार व्यक्त केले. पक्षातील सर्व नेत्यांकडून मला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल असेही ते म्हणाले.



तसेच आगामी निवडणूक खूप मोठे आव्हान असून मुंबईकरांसमोर आम्ही सकारात्मक कार्यक्रम घेऊन जाणार आहोत असे देवरा यांनी सांगितले. प्रत्येक मुंबईकराला 500 चौरस फूट घर देणार असल्याचे आश्वासनही देवरा यांनी यावेळी दिले. आम्ही गटबाजी नाही तर सर्व एकत्र येऊन काम करणार असल्याचे देवरा यांनी म्हटले आहे. 
 




 माजी खासदार मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले आहे. संजय निरूपम यांच्या अनेक तक्रारी हाय कमांडकडे गेल्या होत्या. गेल्या वर्षभरात तर या तक्रारी वाढल्या होत्या. त्यांच्या नावाला अनेकांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर हाय कमांडने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची माळ पडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याने देवरा यांच्याकडून अपेक्षा वाढली आहे.



लोकसभा निवडणुकीत सर्वांना संभाळून घेणारा नेता काँग्रेसला हवा होता. संजय निरूपम यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ते स्वत: आणि पक्ष देखील अनेकदा अडचणीत आला होता. तर मिलिंद देवरा हे सुशिक्षित, संयमी आणि काँग्रेस परिवाराशी जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मधून निरूपम यांना उमेदवारी आहे त्यांच्याविरूद्ध शिवसेनेचे गजानन किर्तीकर उभे आहेत.