नांदेड : loksabha election 2019 लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रत्येक पक्षातील मोठे नेते जनतेपर्यंत पोहोचत शक्य त्या सर्व परिंनी आपलं योगदान देत आहेत. याच उत्साही वातावरणात नांदेडमध्ये मात्र राजकीय वातावरणाला भावनिक किनार मिळाल्याचं पाहायला मिळालं. जिथे एका प्रचारसभेमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं भावनिक वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. प्रदेशाध्यक्षपदी असतानाही नांदेडबाहेर निघण्याची संधी चव्हाण यांना मिळत नसल्य़ामुळे अखेर त्यांनीच आपल्याला अडकवलं जात असल्याचं वक्तव्य केलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मला चक्रव्यूहात अडवलं जात आहे. मी तुमच्यासोबत जगणार आणि तुमच्यासोबतच मरणार', असं यावेळी म्हणत त्यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केल्याचं पाहायला मिळालं. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी नांदेडकरांना भावनिक साद घातल्याचं पाहायला मिळालं. चव्हाणांच्या या वक्तव्याचा रोख हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष दिल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये एकूण तीन प्रचारसभा घेतल्या. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही एक सभा नांदेडमध्ये झाली होती. 


भाजपकडून घेण्यात आलेल्या या सभांना चांगला प्रतीसादही मिळाला होता. भाजप सध्या नांदेडमध्ये जास्त लक्ष घालत असून खुद्द पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हेसुद्धा गेल्या पंधरा दिवसांपासून इथेच तळ ठोकून आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही नांदेडवरच लक्ष देण्यास प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे इथे दोन्ही पक्षांच्या प्रचारामध्येही चांगलीच खडाजंगी जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाणही गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्येच असून, येथील मतदार संघांमध्ये ते स्वत:प्रचारासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. पण, त्यांची ही भूमिका पाहता आगामी काळासाठी भाजपची खेळी एका अर्थी यशस्वी होताना दिसत असून, चव्हाणांनाही परिस्थितीचा अंदाज आल्याचं स्पष्ट होत आहे. तेव्हा आता त्यांनी नांदेडकरांना घातलेली साद, कितपत परिणांकारक ठरणार, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.