गोंदिया : काँग्रेसचा जाहीरनामा देशविरोधी आहे. असा जाहीरनामा शरद पवार यांना मान्य आहे का, गोंदियाच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवाल विचारला आहे. राष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद असल्याचा टोला, यावेळी मोदी यांनी लगावला. मोदी म्हणालेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आजकाल झोप येत नाही. त्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे. तिहार जेलच्या आत जो गेला आहे तो काही बोलेल का, हा प्रश्न त्यांना छळतो आहे. सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील, तो दिवस दूर नाही, असे सूचक विधान मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदींचा इशारा नेमका कोणाकडे होता ? तिहार जेलमध्ये अशी कोणती व्यक्ती आहे ? असे अनेक प्रश्न नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर उपस्थित होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी यांची राज्यातील दुसरी प्रचारसभा गोंदियात पार पडली. पहिल्या सभेत गर्दी कमी होती. त्यामुळे दुसऱ्या सभेत गर्दी होणार का, याचीच चर्चा सुरु होती. मात्र, मोदींच्या तिहार जेलचा उल्लेख सध्या चर्चेचा विषय झालाय. या सभेत मोदींनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी महायुती महाराष्ट्रातील महाभेसळ साफ करणार असे वक्तव्य मोदींनी केले आहे. मोदींनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. घराणेशाहीला संपृष्टात आणण्याचा विडा उचलला आहे, असे मोदींनी यावेळी सांगितले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या कटाचा भाग अशी टीका मोदींनी केली.


पुन्हा एकदा मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला. दिल्लीत एसीमध्ये बसलेले लोक रोज नव्या गोष्टी सांगत आहेत. मोदीचे नाव घेतले की त्यांची झोप उडत आहे. लोक बालाकोट विसरले असे म्हणत आहेत. त्यांना मला सांगायचं आह की देश अजून 1962 चे युद्ध विसरलेला नाही तर बालाकोट कसा विसरेल, असे मोदींनी सांगितले. सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा देश प्रथम येतो नंतर पक्ष असे मोदी म्हणालेत.


काँग्रेसकडून पुन्हा एकदा देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असून देशावर पूर्ण कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसकडून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहे का सांगावे, असे आवाहन केले आहे.