मुंबई : उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपुर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या निवडणूक लढवण्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून उर्मिलाला उत्तर मुंबईतून काँग्रेस पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्मिलाला काँग्रेसतर्फे दिल्लीत बोलवण्यात आले होते.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उर्मिला मातोंडकरचे वडील श्रीकांत मातोंडकर हे ग्रींड्लॅस बॅंकमध्ये एआयबीईए संघटनेचे नेते होते. ते राष्ट्र सेवा दलाचे असून उर्मिला याही सेवा दलाशी संबंधित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणूक २०१९ साठी उत्तर मुंबईतून मराठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनीही उमेदवारी मागितली होती. परंतु उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून उर्मिलाचे नाव पुढे आले आहे. उर्मिलाला उमेदवारी मिळाल्यास उर्मिलाचा मुकाबला भाजपाचे तगडे उमेदवार खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे. गोपाळ शेट्टींच्या विरोधात काँग्रेसकडून एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याचा प्रयत्न होता. उर्मिला मातोंडकरच्या रुपाने काँग्रेसला हा चेहरा मिळाला आहे. 


२०१४ साली उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर निरुपम इथून निवडणूक लढवण्यास तयार नसून त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम नाईक यांचा अभिनेते गोविंदा यांनी पराभव केला होता. हा इतिहास लक्षात घेता ग्लॅमरस चेहरा दिला तर उत्तर मुंबईत चमत्कार होऊ शकतो अशी आशा काँग्रेसला आहे. त्यामुळे आता उर्मिलाने उत्तर मुंबईतून निवडणूक लढवल्यास कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
ऑल इंडिया बॅंक विमेन फेडरेशनच्या प्रथम अधिवेशनांत उर्मिला मातोंडकर ही विशेष अथिति म्हणून आमंत्रित होती. श्रीकांत मातोंडकर यांचे पुरोगामी चळवळीशी निकटचे संबंध असून नेहेमीच चळवळीला आर्थिक मदतीसह सक्रीय मदत करीत असतात. आपण निवडणुकी पुरते काँग्रेसमध्ये आली नसून मी आधीपासूनच या विचारधारेशी जोडली गेली असल्याचे तिने यावेळी सांगितले.