Ajit Pawar React On Controversial Comment: बारामती लोकसभा (Loksabha Election 2024) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेही आजच उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी आज सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांबरोबर पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये गणपतीची आरती केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी नुकत्याच इंदापूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या 'लोकसभा निवडणुकीला बटण कचाकचा दाबा, तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो' या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.


दगडूशेठ गणपतीकडे अजित पवारांनी काय मागितलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी आज सकाळी सपत्नीक दगडूशेठ गणपतीची आरती केली. त्यानंतर त्यांनी मंदिराबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवाकडे काय मागितलं असं विचारलं असता अजित पवारांनी, 'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना त्यात महाराष्ट्राचा मोठं योगदान हवं. मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार निवडून यावेत अशी प्रार्थना बाप्पाकडे केली," असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी निवडणुकीचा निकाल हा जनतेच्या हातात असतो. विश्वास संपादन करण्याचा सर्वचजण प्रयत्न करत असतात. मात्र शेवटी निकाल हा जनताच ठरवते, असंही म्हटलं.


शक्तीप्रदर्शन करणार नाही


आज शक्तीप्रदर्शन करणार का? असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी, "शक्तीप्रदर्शन वगैरे काही करणार नाही. उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी सीएम (मुख्यमंत्री) आणि दोन्ही डीसीएमनी (उपमुख्यमंत्र्यांनी) जायचं ठरलं आहे. त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहोत," असं म्हटलं. यावेळेस अजित पवारांनी, "निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात," अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्याप्रमाणे आज उमेदवारांचे फॉर्म भरल्यावर सभा होतील आणि नंतर नेते मंडळी आपआपल्या नियोजित कार्यक्रमांना निघून जातील असंही अजित पवारांनी सांगितलं. 


नक्की वाचा >> ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेख


..म्हणून निधी देण्यासंदर्भातील विधान केलं


अजित पवारांना कचा-कचा बटण दाबा म्हणत मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप होत असल्याचं सांगत त्यांच्या विधानासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नेमकं त्या कार्यक्रमात काय घडलं हे सांगितलं. "परवा राहुल गांधी काय म्हणाले त्यावर मी प्रतिक्रिया दिली. कोणीही 'ध चा मा' करु नये. मी गंमतीने हसत हसत बोलत होतो. त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वजण डॉक्टर आणि वकील मंडळी होती. शिक्षित वर्गाची ती सभा होती. ती काही जाहीर सभा नव्हती. त्यामुळे मी तसं बोललतो. ते एका छोट्या हॉलमधलं वक्तव्य होतं," असं अजित पवारांनी सांगितलं. तसेच प्रलोभनं दाखवल्याच्या आरोपावरुन बोलताना, "आम्ही असं करणार तसं करणार असं जाहीरनाम्यात सांगतात. मग ते प्रलोभन दाखवलं आहे असं म्हणतात का? उद्या निधी देताना विकासकामाला रस्ते डेव्हलपमेंटला निधी देणं हे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींचं कामच असतं. आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की या भागाचा आधीपेक्षा जास्त विकास आम्ही करुन, निधी देऊ असं सांगायचा प्रयत्न असतो," असं अजित पवार म्हणाले. "मी नेहमीच विचार करुन बोलतो. आचारसंहितेने घालून दिलेल्या नियमांचा आणि आचारसंहितेचा भंग होता कामा नये अशी खबरदारी मी कायमच घेत असतो," असंही अजित पवारांनी सांगितलं. 


कचा-कचाबद्दल अगदी हात जोडून म्हणाले...


कचा-कच बटण दाबा या विधानावरुन बोलताना अजित पवारांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या एका भाषणाचा उल्लेख केला. अगदी हात जोडून अजित पवारांनी या कचा-कचा शब्दाचा वापर का केला हे सांगतानाच पुढे हा विषय वाढवून नये अशी अपेक्षा व्यक्त केली. "एका भाषणात राहुल गांधींनी एका भाषणात आम्ही तुमच्या अकाऊंटला खटाखट खटाखट पैसे टाकू असं काहीतरी ते म्हणाल्याचं मला सकाळी कोणीतरी सांगितलं. ते खटा-खटा म्हणाले. मी म्हणालो कचा-कचा. आमच्या ग्रामीण भागातील तो शब्द आहे. याचा फार पुढे बाऊ करुन नये अशी आमची अपेक्षा आहे," असं अजित पवार प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमोर हात जोडून म्हणाले. 


नक्की वाचा >> 'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा


फडणवीसांबरोबरच्या भेटीवर काय म्हणाले अजित पवार?


कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बैठक घेतल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता. "मी काल रात्री 9 वाजता गेलो आणि 10.30 ला मी तिथून बाहेर पडतो. त्यांची बैठक बराच वेळ चालली. भाजपा महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून फडणवीस काम करतात. मला आणि त्यांना काही गोष्टींवर बोलायचं होतं. त्यासाठी आम्ही एकत्र चर्चेला बसलो होतो," असं अजित पवारांनी सांगितलं.