`...तर अजित पवार मलाच मतदान करतील`; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास
Baramait Constituency Supriya Sule On Ajit Pawar: अजित पवार यांनी मागील काही आठवड्यांपासून बारामतीमध्ये घेतलेल्या छोट्या छोट्या सभांमधून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधताना मतदासंघात विकासकामं न झाल्याचा दावा केला.
Baramait Constituency Supriya Sule On Ajit Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात निवडणुकीत उभ्या असलेल्या सुनेत्रा पवारही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून होणाऱ्या टीकेसंदर्भात सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवार आपल्यालाच मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला. मात्र सुप्रिया सुळे नेमकं असं का म्हणाल्या? जाणून घेऊयात...
अजित पवारांनी केलेली सुप्रिया सुळेंवर टीका
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला जाण्याआधी सुप्रिया सुळेंनी आज सकाळी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. यापैकी एका प्रश्नामध्ये अजित पवारांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा संदर्भ पत्रकारांनी दिली. अजित पवार यांनी मागील काही आठवड्यांपासून बारामतीमध्ये घेतलेल्या छोट्या छोट्या सभांमधून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधताना मतदासंघात विकासकामं न झाल्याचा दावा केला. अजित पवारांनी तर आपल्या आमदार निधीतून झालेल्या कामांचा उल्लेख येथील खासादारांनी त्यांच्या कार्यअहवालात केल्याचा टोलाही सुप्रिया सुळेंना लगावला होता.
'मी आजच त्यांना...'
अजित पवारांनी केलेल्या याच टीकेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. "15 वर्षात कोणत्याही प्रकारचा निधी बारामतीत आणला नाही, त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून द्या आता, असं अजित पवार म्हणालेत," असं म्हणत पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, "कदाचित त्यांनी माझा मराठीतील कार्यअहवाल वाचला नसावा. मी आजच माझा कार्यअहवाल त्यांना पाठवून देईल. त्यांनी थोडासा जरी वेळ काढला आणि वाचला तर उद्या सकाळी मेरीटवर ते मलाच मतदान करतील," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नक्की वाचा >> 'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'
शरद पवारांवर टीका केल्याशिवाय...
शरद पवारांवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. 2019 ला शरद पवार आमच्यासोबत येणार होते पण ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय बदलला असं मुख्यमंत्री शिंदेंचं म्हणणं आहे, असं म्हणत पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, "तुम्हाला ही टेप ऐकून कंटाळा नाही आला का? वास्तव काय आहे? आरोप करायचे आणि पळून जायचं. आज कोण कुठे उभा आहे हे महत्त्वाचं आहे. सातत्याने ते हेच बोलत राहतात. निवडणूक देशाच्या विकासाची आहे की शरद पवारांसाठी आहे. त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना. गेले सहा दशकं शरद पवारांवर टीका केली ही हेड लाईन होते. म्हणजे तेच नाणं टिकतंय ना गेली सहा दशकं,' असं अजित पवार म्हणाले.