Supriya Sule WhatsApp Status: बारामती मतदारसंघामध्ये नणंद-भावजय असा थेट संघर्ष पवार कुटुंबातील सदस्यांमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर याच मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साताऱ्याबरोबरच अन्य काही जागांवर शरद पवार गटाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दुसरीकडे बारामतीमध्ये दोन्ही बाजूने जोरादर प्रचाराला सुरुवात झाली आहे. शरद पवार राष्ट्रीय स्तरावरील 'इंडिया' आघाडीसंदर्भातील कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते वेगवेगळ्या मतदारसंघांचे दौरे करुन उमेदवार कोण असावा यासंदर्भातील चाचपण्या करत आहेत. असं असतानाच आता सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. 


सुप्रिया सुळेंच्या स्टेटसमधील शरद पवारांच्या फोटोंचा संदर्भ काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला शरद पवार यांच्या समर्थकांकडून व्हायरल केला जाणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शरद पवारांचे 2 फोटो दिसत आहेत. यापैकी डवीकडील फोटो हा पक्षामध्ये फूट पडून अजित पवार आणि समर्थक आमदार दूर गेल्यानंतर झालेल्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमधील आहे. तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्वत: हात वर करत 'मी' असं हसत उत्तर दिलेलं. हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.


दुसरा फोटो कॉलर उडवणारा


दुसरा फोटो सुद्धा शुक्रवारी साताऱ्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतील आहे. उदयनराजे भोसले तिकीट मागायला आल्यास तुमच्या पक्षाकडून तिकीट देणार का? या प्रश्नावर शरद पवारांनी अशी काही शक्यता नाही असं उत्तर दिलेलं. त्यानंतर अन्य एका पत्रकारने तुम्ही उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवणार का? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्येच दोन्ही हातांनी आपली कॉलर उडवून दाखवली होती. हे पाहून पत्रकारांबरोबरच त्यांच्या बाजूला बसलेले खासदार श्रीनिवास पाटील आणि इतर सहकारीही खदखदून हसले होते. 



व्हिडीओला सूचक गाणं


शरद पवारांचे या दोन्ही प्रसंगातील फोटो बाजूबाजूला लावून एका गावरान गाण्यात तयार करण्यात आलेला व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला आहे. पवारांचे दोन्ही पत्रकार परिषदेतील फोटो लावून त्याखाली 'येऊ दे कितीबी' असं लिहिलेलं आहे. तसेच समोर दंडातील ताकद दाखवणारा इमेजी वापरण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला, "पीडा किती, मला नडा किती, द्या द्यायचा जेवढा त्रास; आरं किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास," हे लिरिक्स असलेलं गाणं लावण्यात आलेलं आहे. या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी शरद पवार हे एकटेच सर्व विरोधकांना पुरुन उरतील असं सूचित केलं आहे.


नक्की वाचा >> शरद पवारांची भाजपाला गुगली! साताऱ्यात उदयनराजेंविरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी?



निवडणुकीला उभं राहण्यासाठी घातली जातेय गळ


शरद पवार रविवारी नवी दिल्लीमधील रामलिला मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'लोकशाही वाचवा रॅली'मध्ये सहभागी झाले होते. शरद पवारांना माढा तसेच सातारा मतदारसंघातून तुम्ही स्वत: निवडणुकीला उभं राहा अशी गळ कार्यकर्त्यांकडून घातली जात आहे.