राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपाचा डोळा, केंद्रीय मंत्र्यांचा दौरा, थेट पवारांना आव्हान
भाजप बारामती लोकसभा मतदार संघात रणशिंग फुंकणार
जावेद मुलाणी, झी मिडिया, बारामती : भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती (Baramati) मतदारसंघावर आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना घेरण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
विशेष मिशन बारामती
भाजपने 'मिशन बारामती' हाती घेतलं असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या 16 ऑगस्ट पासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रयोगावर कायमचा उतारा शोधण्यासाठी भाजपने आता महासंग्रामाच्या अंतिम लढाईचा नारा दिला आहे. जिथे कधीच भाजप विजयी झाला नाही. तिथे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय लढाईची पद्धत वापरली जाणार आहे. प्रत्येक चार मतदारसंघामागे एक केंद्रीय मंत्र्याकडे जबाबदारी देण्यात आली असून तीच रणनिती बारामती मतदारसंघात राबवली जाणार आहे.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना भाजपने दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिलं होतं. भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते अनेक दिग्गजांच्या सभा बारामती मतदारसंघात झाल्या होत्या .
आता 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकाद भाजप पूर्ण ताकदनिशी उतरणार आहे. आगामी निवडणुकीत सुळे याच बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार भाजपकडून दिला जाईल हे निश्चित.
त्यासाठी मतदारसंघात आतापासून संपर्क वाढविण्यावर भाजपने भर दिला आहे. या संपर्क अभियानाची सुरुवात अर्थमंत्री सीतारामन यांच्या दौऱ्यापासून होणार आहे. विविध केंद्रीय मंत्री बारामती लोकसभा मतदारसंघात नजीकच्या काळात दौरे करणार आहेत. 2024 च्या निवडणुकीपर्यंत दौऱ्यांचा हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे.
केंद्रीय मंत्री सीतारमण यांचा बारामती दौरा
16 ऑगस्ट पासून सितारामन यांचा दौरा सुरू होणार आहे .तीन दिवसीय दौऱ्यात त्यांच्या समवेत बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी होणार आहेत .
मंगळवारी 16 ऑगस्टला सितारामन या बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला आणि भोर इथं येणार आहेत. तर बुधवारी 17 ऑगस्टला इंदापूर व दौंड, गुरुवारी 18 ऑगस्टला रोजी बारामती व पुरंदरला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.
या सर्व ठिकाणी भाजपकडून स्वतंत्रपणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दौऱ्याच्या तयारीसाठी 9 ऑगस्टला बैठक
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि संपूर्ण देशाच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या सितारामन यांच्या दौऱ्याचे काटेकोर नियोजन भाजपकडून केलं जात आहे. त्यासाठी मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बारामतीत भाजपची बैठक पार पडणार आहे.
---