Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुरुवारी धाराशिवमधील उमरगा येथील सभेतून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं. भारतीय जनता पार्टीमध्ये नितीन गडकरींसारख्या मोठ्या नेत्याचा सन्मान केला जात नसल्याचं उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या लोकसभेच्या पहिल्या उमेदवार यादीत गडकरींचं नाव नसल्याचा उल्लेख करत म्हटलं. मात्र ठाकरेंनी दिलेल्या या ऑफरवरुन महाराष्ट्रातील भाजपाचे आघाडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. खोचक शब्दांमध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. 


उद्धव ठाकरे गडकरींबद्दल नक्की काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंनी थेट नितीन गडकरींचं नाव घेत भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत गडकरींचं नसून भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या कृपाशंकर सिंह यांचं नाव मात्र असल्याचं नमूद केलं. "भाजपाची पहिली यादी जाहीर होऊन चार दिवस झाले. 195 जणांची यादी जाहीर केली. त्यात नरेंद्र मोदींचं नाव आहे. अमित शाहांचं नाव आहे. आणखीन कोणाकोणाची नावं आहेत. त्यात आणखीन एक नाव आहे कृपाशंकर सिंह. काँग्रेसमधून यांच्या उरावर आलेले. त्यांच्यावर याच भाजपावाल्यांनी बोंबलत बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचं सांगत होते. त्या बेहिशोबी संपत्ती गोळा करणाऱ्याचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांबरोबर पहिल्या यादीमध्ये येतं. पण ज्यांनी भाजपा रुझवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंच्याबरोबरीने आणि त्यांच्यानंतर युतीमध्ये मेहनत करणाऱ्या नितीन गडकरींचं नाव त्यामध्ये नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.


थेट भाजपा सोडून येण्याची ऑफर


"नितीनजी भाजपा सोडून द्या. राहा उभे आम्ही महाविकास आघाडीकडून तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा. महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला आग्र्यामध्ये कधी झुकले नव्हते. ना तो त्यावेळेला झुकला तो यांच्यासमोर झुकणार. आज मी नितीन गडकरींना जाहीर सांगतोय की द्या राजीनामा आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी," असं उद्धव ठाकरे गडकरींना महाविकासआघाडीमधून निवडणूक लढण्याचं आवाहन करताना म्हणाले.


नक्की वाचा >> महिला धोरण जाहीर! 'या' महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत मिळणार भरपगारी सुट्टी


उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर


उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरबद्दलचा संदर्भ देत पत्रकारांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या ऑफरबद्दल बोलताना फडणवीसांनी, "ज्या पक्षाचा बॅण्डबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे," असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. "खरं म्हणजे, माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राचा तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा गडकरीजींचं नाव येईल. त्यामुळे असं वाटतं की या ठिकाणी स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी करत आहेत त्यामुळे त्यांचं हसू होतंय," असंही फडणवीस म्हणाले.