Maharashtra Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी सोलापूरमधील सभेमधून टीकास्त्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंवर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले आहेत. पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला नकली म्हणाल्याचा मुद्दा उपस्थित करत 'नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?' असा टोला लगावला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी लस दिल्याने आपण जिवंत असल्याचं विधान केलं होतं त्यावरुनही उद्धव ठाकरेंनी टोला लगावताना 'मोदींनी लस बनवली मग संशोधक काय गवत उपटत होते का?' असं म्हटलं होतं. यावरुनच बावनकुळेंनी संताप व्यक्त केला आहे.


फडणवीसांच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच," असं म्हणत बावनकुळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. "उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीसांसोबत आहेत," असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. तसेच पुढे बावनकुळेंनी रामदास स्वामींच्या एका ओवीचा संदर्भ दिला आहे. "खरं तर समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं सांगतांना लिहून ठेवलंय. तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामी" असं बावनकुळेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही


"उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते. उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना सुद्धा नकोशी झाली आहे," असंही बवानकुळेंनी म्हटलं आहे. "उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा. 4 जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही," असा इशाराही बावनकुळेंनी पोस्टच्या शेवटी दिला आहे. 



आता या टीकेला ठाकरे गट काय उत्तर देतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.