Loksabha Varsha Gaikwads: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कुठे राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जातेय तर कुठे कोणत्या नेत्याचा पत्ता कट केला जातोय. पण उत्तर मध्य मुंबईत वेगळेच चित्र पाहायला मिळतंय. येथे कॉंग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. राजकारणात प्रवेश करणाऱ्या उज्ज्वल निकम यांची सुरुवातच लोकसभा निवडणुकीपासून होतेय. मुंबईकरांमध्ये उज्ज्वल निकम यांचा चांगला परिचय आहे. आता उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसमधूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीविरोधात मुंबईत कॉंग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत नसीम खान, हंडोरे, भाई जगताप, सुरेश शेट्टी हे नेते उपस्थित आहेत. MCA क्लबमध्ये ही बैठक सुरू आहे. 


महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला हिरवा सिग्नल दिला आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रचाराला धडाक्यात सुरुवातदेखील केली आहे. असे असले तरी त्यांनी अजून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाहीय. उद्या 30 एप्रिल 2024 रोजी त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 


त्याआधीच काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी बैठक घेतली आहे. कॉंग्रेसने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही हे कारण सांगत नसिम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे नसिम खान आता उत्तर मध्य मुंबईतून लढण्यास इच्छुक आहेत का? नसिम खान यांना उमेदवारी देऊन कॉंग्रेसकडून त्यांची नाराजी दूर केली जाणार का? हे सर्व पाहणे महत्वाचे ठरणार आहे.