Loksabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता दिल्लीत हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चित करण्यासाठी आज (6 मार्च) रात्री बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपकडून राज्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "इतक्या जागा मिळणार, तितक्या जागा मिळणार ही पतंगबाजी आहे आणि अशाप्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे", असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 


भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या दिल्लीत भाजप राज्य कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री आमदार आशिष शेलार, प्रविण दरेकर तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहे. भाजपच्या मुख्यालयातील बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी एक बैठक होणार आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीसाठीच्या भाजपच्या पहिल्या यादीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.


'...म्हणून पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं नाहीत'


"जर तुम्ही पहिली यादी पाहिली असेल तर त्यात युती असलेल्या राज्यातील उमेदवारांच्या नावाचा समावेश नाही. कारण युती असलेल्या राज्यात त्या त्या पक्षांची चर्चा करुन ती नावं जाहीर केली जाते. पहिल्या यादीत जिथे फक्त भाजप पक्ष एकटा लढतो त्याच राज्यातील उमेदवारांची नाव जाहीर झाली आहेत. त्यानंतर आता लवकरच जिथे युती आहे, त्या ठिकाणची नाव जाहीर होतील. तुम्ही त्याची काळजी करु नका. तुम्हाला योग्य वेळी सर्व माहिती मिळेल. तसेच आमचे जे काही निर्णय होतील, त्याचीही पूर्ण माहितीही आम्ही पोहचवू", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


त्यापुढे ते म्हणाले, इतक्या जागा मिळणार, तितक्या जागा मिळणार ही पतंगबाजी आहे. अशाप्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे, असं मला वाटतं. आमचे जे दोन्हीही साथीदार आहे, त्यांना आम्ही योग्य सन्मानाप्रमाणे जागा देऊ. त्यामुळे मीडिया स्वत:हून एवढ्याच जागा, तेवढ्याच जागा हे जे काही ठरवतं आहे हे मीडियाने बंद केलं पाहिजे. हे अतिशय चुकीचे आहे.


आज राज्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार?


दरम्यान महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत आज रात्री दिल्लीत भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रात्री भाजप मुख्यालयात ही बैठक होईल. त्यापूर्वी काही तासांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची बंद दाराआड बैठक पार पडली. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोललं जात आहे