प्रणव पोळेकर, झी 24 तास, सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण रोज नवनवीन वळणं घेताना दिसतंय.  कोकणामध्ये शिंदे गटाला जोरदार धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर दावा केला होता. पण समोर आलेल्या फेसबुक पोस्टनुसार त्यांनी येथून माघार घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर किरण सामंत यांनी सुरुवातीपासून दावा केला होता. येथे त्यांनी मतदारांमध्ये फिरण्यास सुरुवात केली होती. तसेच उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग पट्ट्यात कामाचा धडाकादेखील लावला होता. कोकणावर आमचाच दावा राहील, असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केले होते. यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचाच उमेदवार राहीलं. पक्षाने उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवेन. इतर कोणी लुडबूड करु नये असे जाहीर आव्हान भाजप नेते नारायण राणे यांनी मित्र पक्षांना दिले होते. यानंतर शिंदे गट येथून माघार घेणार का? अशी चर्चा सुरु होती. दरम्यान किरण सामंत यांची पोस्ट समोर आली होती. काही वेळानंतर ही पोस्ट फेसबुकवरुन डिलीट करण्यात आली. 



काय होती पोस्ट?



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अब कि 400 पार होण्याकरिता रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून माघार घेत असल्याची पोस्ट समोर आली. या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल झाले. पण नंतर किरण सामंत यांच्या अकाऊंटवर ही पोस्ट दिसेनासी झाली.  


गेले काही दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी बाबत भाजप आणि शिंदे ची शिवसेना यामध्ये दावे प्रतिदावे सुरु होते.शिवसेनेला हा मतदार संघ हवा होता तसा दावा ही केला होता. दरम्यान रात्री उशिरा किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. पण काही वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक आता ठाकरे विरुद्ध राणे अशीच होणार अस बोललं जातंय.


सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा भाजपचाच असल्याचे सांगून आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आम्ही नारायण राणेंच्या नेतृत्वात महायुतीत काम करु असे सामंतांचे विधान समोर आले होते.