Loksabha Election 2024 Maharashtra Politics: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या साताऱ्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळाच पॅटर्न पाहायला मिळू शकतो. यासंदर्भातील स्पष्ट संकेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. सातारा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. मात्र या ठिकाणी श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत निवडणूक लढवण्यास समर्थता दर्शवल्याने मागील वेळेप्रमाणे यंदा उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाहीत. त्यामुळेच शरद पवार कोणता उमेदवार देणार यासंदर्भात चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटल्यानंतर सूचक विधान केलं आहे.


45 ते 46 जागा निश्चित झाल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीमधील जागा वाटपासंदर्भात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी, "महाविकास आघाडी 48 जागा लढणार आहेत. त्यापैकी 45 ते 46 जागा निश्चित झाल्या आहेत. 1-2 जागा कोण लढणार यावर चर्चा आहे. आमचे काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेते, शिवसेनेचे नेते आणि शरद पवार गटाबरोबर चर्चा करुन तो सोडवला जाईल. त्या जागेवर उमेदवार कोणता असेल ही पुढच्या टप्प्याची चर्चा असून काही ठिकाणी ती सुरु झाली आहे," अशी माहिती दिली. तसेच पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी, "साताऱ्यात देखील ही चर्चा सुरु आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मला भेटले. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आहे. इथला उमेदवार त्यांनी ठरवायचा आहे. तुम्ही जो उमेदवार ठरवाल तो आम्हाला मान्य आहे. तो उमेदवार निवडून देण्यासाठी आम्ही, आमची संघटना, कार्यकर्ते कटीबद्ध आहोत," असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 


शरद पवारांनी आदेश दिला तर...


मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे इथे सक्षम उमेदवार नसल्याचं चित्र दिसत असून यावर काँग्रेस काय करणार? अशा अर्थाचा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी, "काँग्रेस यासंदर्भात काही करणार नाही. हा स्थानिक प्रश्न आहे. तो शरद पवारांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. जो काही सर्वमान्य निर्णय होईल तो मान्य असेल," असं म्हटलं. तुम्हाला उमेदवारी दिली शरद पवारांनी तर निवडणूक लढणार का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक उत्तर दिलं. "मला जर त्यांनी (शरद पवारांनी) आदेश दिला तर माझी (सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक) लढायची तयारी आहे. पण हा निर्णय शरद पवारांचा आहे," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "एक निश्चित आहे चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमीमध्ये जातीवादी विचार शिरणार नाहीत, प्रवेश करणार नाहीत यासाठी ते कटीबद्ध आहेत आणि कटीबद्ध आहोत," असा विश्वासही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.


नक्की पाहा हा व्हिडीओ >> Video: उदयनराजेंना तुम्ही तिकीट देणार का? प्रश्न ऐकताच कॉलर उडवत शरद पवार काय म्हणाले पाहा


साताऱ्यामधून कोणाच्या नावांची चर्चा?


सध्या तरी शरद पवार गटाचा विचार केला तर साताऱ्यामधून 3 नावांची चर्चा आहे. यामध्ये राज्याचे माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा समावेश आहे. मात्र यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर केवळ शरद पवारांच्या नावावर या तिघांपैकी कोणालाही किती मतं पडतील याबद्दल शंकाच आहे. त्यातच समोर उदयनराजेंसारखा उमेदवार असल्याने हे तिन्ही दुसऱ्या फळीतील नेते किती आव्हान देऊ शकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


भाजपाबद्दल लोकांमध्ये सहानुभूती नाही


सध्या केंद्रात असलेल्या सरकारबद्दल सर्वसामान्यांमध्ये सहानुभूती आहे असं वाटतं का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी,"अशी कोणती सहानुभूती वाटत नाही. 2019 मध्ये बालाकोटमुळे त्यांची 6 टक्के मतं वाढली. राम मंदिरामुळे मतं वाढतील असं त्यांना वाटलेलं पण तसं काही झालं नाही. हा दोन गटांमधील जमिनीचा वाद होता. यात नरेंद्र मोदींचा काय संबंध आहे? हा खासगी विषय आहे," असं उत्तर दिलं. 


नक्की वाचा >> सुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष


भाजपा 250 ही पार करणार नाही


तसेच, "संसदेमधील 543 सदस्यांमध्ये घटना बदलायची असेल तर दोन तृतियांश मतं आवश्यक आहे. हा आकडा 370 च्या आसपास येतो म्हणून भाजपाने 400 पार अशी घोषणा देण्यात आली आहे. आंबेडकरांची घटना बदलण्याचा यांचा इरादा आहे. पण ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असून मला नाही वाटत की भाजपा 250 चा आकडा सुद्धा पार करेल," असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.