Mumbai University Exam Rescheduled: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये म्हणजेच 20 मे रोजी मुंबईसहीत महाराष्ट्रातील एकूण 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत होणाऱ्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भातील माहिती विद्यापीठानेच दिली आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 मे रोजी कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नव्हत्या. मात्र निवडणुकीसंदर्भातील नियोजन आणि विद्यापीठाअंतर्गत 20 मे व्यक्तिरिक्त इतर तारखांना मतदान होणाऱ्या मतदानसंघातील जिल्हे येत असल्याने तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.


केवळ तारखांमध्ये बदल; वेळ आणि परीक्षाकेंद्रं तीच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या बदललेल्या सुधारित तारखांची माहिती एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या परिपत्रकानुसार 6 मे रेजी होणाऱ्या सर्व परीक्षा आता 18 मे रोजी होणार आहेत. तर 7 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा 25 मे रोजी गेण्यात येणार आहेत. तसेच 13 मे रोजी ज्या परीक्षा घेण्यात येणार होत्या त्या आता थेट 8 जून रोजी घेतल्या जातील असं विद्यापीठाने म्हटलं आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षांच्या केवळ तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र परीक्षेची वेळ आणि केंद्र यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असं मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने म्हटलं आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई आणि उपनगरांचा समावेश असलेल्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे.


कुठे कधी मतदान?


मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, रत्नागिरी या 7 जिल्ह्यांपैकी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये 7 मे रोजी मतदान आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान 13 मे रोजी पार पडत आहे. पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईमधल्या एकूण 6 मतदारसंघांमध्ये मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. 


नक्की वाचा >> 'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'


या सर्वांना बदललेलं वेळापत्रक लागू


मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व कला, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विधि महाविद्यालयांच्या, तसेच विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी हे बदलेलं वेळापत्रक लागू असेल, असं विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे.