`..नाहीतर मराठ्यांचं वर्चस्व काय ते तुम्हाला विधानसभेला दाखवून देऊ- जरांगेचा इशारा
Manoj Jarange Patil to Political Party: मराठे एकजूट झाल्याची भीती देशाला बसलीय. म्हणूनच मध्यप्रदेशात एका टप्यात निवडणुका होतायेत. तर महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका घ्याव्या लागतायेत, असे जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Patil to Political Party: मराठा समाजातील काही उमेदवार वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा आहे किंवा आम्ही मराठा समाजाचे उमेदवार असं सांगत आहेत. मनोज पाटलांच्या नावाने मत मागितले जात असल्याचे समोर आले आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी सर्वांना इशारा दिला आहे. मी कोणात्याच अपक्षाला पाठिंबा दिला नाहीये. ना कुणाला उभा केले आहे, कोणता गामीनी कावा करीत नाहीये, शिवाय महायुती किंवा आघाडीला सुद्धा माझा पाठिंबा नाहीये. आम्ही समाजाच्या जीवावर ही निवडणूक सोडलेली आहे. कोणाला पडायचं अन कोणाला आणायचं ते समाजाने ठरवायचे आहे. मराठे एकजूट झाल्याची भीती देशाला बसलीय. म्हणूनच मध्यप्रदेशात एका टप्यात निवडणुका होतायेत. तर महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका घ्याव्या लागतायेत. प्रत्येक टप्यात त्यांना पंतप्रधानांना आणावं लागणार आहे. येथेच मराठ्यांचा खरा विजय असल्याचे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण तसा इशाराच जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणाची आमची मागणी मुकाट्यानं पूर्ण करा. आम्हाला राजकारणाच्या वाटेवर आणू नका, असा इशाराच त्यांनी परभणीत सरकारला दिला. नाहीतर मराठ्यांच वर्चस्व काय असतं, हे तुम्हाला विधानसभेला दाखवून देऊ. तसंच आपण स्वतः मैदानात असू असा सज्जड इशाराच मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिलाय.
मराठे आणि कुणबी एकच आहेत. याच्या बाजूने असणारांना सहकार्य करा. पाडणाऱ्यांना असं पाडा की पडणार पुढच्या पाच पिढ्यात तरी उभं राहिलं नाही पाहिजेत. 8 जूनला आपण बीड जिल्ह्यातील नारायण गडावर नवस एक्कर येथे मराठ्यांची सभा घेत आहोत याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आपला कुठल्याच अपक्षाला पाठिंबा नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. जर कुणी जरांगे पाटलांचा मला पाठिंबा आहे असे म्हणत असेल तर त्याला पाडा. असे आवाहन मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत केलंय.
सगे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी 4 जूनला आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. 8 जूनच्या नावागड येथील सभेला मी अंबुलन्स मधून जाणार असून तेथे करोडोने मराठा येणार आहेत. तेथे मी त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. परत येताना रुग्णवाहिकेतूनच आंतरवाली जाणार आणि आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी सरकारला सोडणार नाही. फक्त माझ्या वाटेला जाऊ नका. माझ्या नादाला लागलात तर मी कोणालाच सोडणार नाही. मराठे एकत्र नव्हते तोपर्यंत तुम्ही माझ्या जातीचा छळ केला. तुम्ही फायदा उचललात. तुमची एखााद्या गावात माणसं असतील पण आजू बाजूने माझे लोकं आहेत. एखाद्या जिल्ह्यात तुमची माणसं असतील पण बाकीच्या जिल्ह्यात माझी माणसं आहेत. अशांतता पसरेल असे काम राज्यात कोणीच करू नये. मला डिवचू नका,तुमचं एवढे दिवस भागलं. तुम्ही अन्याय केलात मराठ्यांवर तेव्हा आम्ही एक नव्हतो पण आता आम्ही एक आहोत,असा सज्जड दम मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. पण कुणाचंच नाव न घेतल्याने जरांगे पाटलांचा ईशारा कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित होतोय.
माझ्या नावाचा सोशल मीडियावर किंवा इतरत्र निवडणुकीत वापर करीत असेल तर मी त्यांचा पाणउतारा केल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या नावाचा अपक्षाने,महायुतीने किंवा आघाडीने वापर करू नये. मी काय एवढा मोठा किंवा देव नाहीये पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी माझ्या समाजाच वाटोळं होईल असं काही करू नका. अन्यथा मला पत्रकार परिषद घेऊन तुमचा कार्यक्रम करावा लागेल. एवढी तुम्ही काळजी घ्या. खोट्या बातम्या पसरवू नका असे आवाहन ही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.