`जानकरांप्रमाणे मीदेखील शरद पवारांना भेटलो असतो तर...` फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले रामदास आठवले?
Ramdas Aathavale Shirdi Loksabha: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रामदास आठवलेंची समजूत काढली.
Ramdas Aathavale Shirdi Loksabha: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी रामदास आठवले आग्रही होते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांना सागर बंगल्यावर आमंत्रित करण्यात आले होते. या भेटीत फडणवीसांनी रामदास आठवलेंची समजूत काढली. त्यांच्या भेटीत काय झालं?, याबद्दल जाणून घेऊया
काय म्हणाले फडणवीस?
झालं गेलं ते विसरुन आपल्याला पुढे जायचं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकायची आहे. आरपीआयच्या मतांच्या जोरावर आम्ही निवडून आलो आहोत. कधी जागा द्यायची याचा आपण विचार करु
मी पवारांना भेटलो असतो तर..
जानकर यांना परभणीची जागा मिळाली आहे. जानकरांनी डावपेच केले म्हणून त्यांना जागा मिळाली त्यांच्या प्रचाराला मी जाणार आहे. जानकर पवारांना भेटून आले. देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकारणी आहेत. त्यांनी जानकरांना एक जागा सोडली. मी पवारांना भेटलो असतो तर मलाही एक जागा सोडली असती. पण मी तसं करणार नाही. कारण मी प्रामाणिक आहे. ज्या पक्षासोबत असेन त्यांच्याशी प्रामाणिक राहतो, असे ते म्हणाले. दरम्यान मला शिर्डीची जागा मिळायला हवी होती, अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकरांचा अपमान
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पाठींबा न देता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीने अपमान केला. शिवसेनेने अगोदर युती केली पण नंतर त्यांना मागे टाकलंय. ते भाजपविरोधात किती गेले तरी मी भाजपसोबत आहे. दलित मतं आम्हाला मिळणार आहेत. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा प्रयत्न करावा, मी माझा प्रयत्न करत राहीनं, असे आठवले म्हणाले.
ईशान्य मुंबईची जागा जिंकलो असतो
जागा नाही तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद आणि विधानसभेत जागा, महामंडळे आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा मिळावा, अशी इच्छा आठवलेंनी व्यक्त केली. आम्ही एनडीए सोबतच आहोत, ईशान्य मुंबईची जागा जिंकू शकलो असतो, असेही ते म्हणाले. रिपाईच्या अडचणी दूर करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही ते म्हणाले.