Loksabha Election 2024 BJP Announce Candidate From Satara: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने अखेर साताऱ्यामधून आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. उदयनराजे भोसले यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार जाहीर करण्यासंदर्भात उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात उशीर होत असल्याने उदयनराजे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. काही आठवड्यांपूर्वी उमेदवारीसंदर्भात संभ्रम असल्याने स्वत: उदयनराजे तीन दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी साताऱ्यातून आपणच लोकसभा लढणार असा विश्वास व्यक्त केलेला. त्यांचा हा विश्वास खरा ठरला असून भाजपाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.


थेट लढाई पवार गटाच्या उमेदवाराशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजे भोसलेंची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंशी होणार आहे. महाविकास आघाडीने जागा वाटपाचा 21-17-10 फॉर्म्युला गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाने साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली. जागावाटापामध्ये साताऱ्याची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली. साताऱ्यातील संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुक लढवण्यास नकार दिल्यानंतर सातारा मतदारसंघातून कोण लढणार हा प्रश्न चांगलाच चर्चेत होता. उदयनराजेंच्या उमेदवारीची दाट शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती त्यामुळे तगडा उमेदवार देण्याचं आवाहन शरद पवार गटासमोर होतं. त्यानुसार पवार गटाने शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केलेली. 


चुरशीची लढाई


साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. उदयनराजेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरची पोटनिवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेचा मुद्दा केली होती. स्वत: शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये त्यांचे जिवलग मित्र श्रीनिवास पाटील यांचा प्रचार केला होता. शरद पवारांनी त्यावेळी घेतलेली पावसातली सभा चांगलीच गाजली होती. या पराभवानंतर उदयनराजेंना भाजपाने राज्यसभेवर खासदारकी दिली. मात्र या पराभावाची सल अजूनही भाजपाला बोचत असून हिशोब चुकता करण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरेल असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने शरद पवार गटाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात त्यांचाही कस लागणार आहे.


नक्की वाचा >> निवडणुकीत पैशांचा पाऊस! पहिल्या टप्प्याआधीच 4658 कोटी जप्त; रोज 100 कोटींची जप्ती


कोण आहेत उदयनराजेंना आव्हान देणार शशिकांत शिंदे?


शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत.त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये त्यांचा चांगलाच राजकीय दबदबा आहे. ते 2009-2014 साठी कोरेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि निवडून आले होते.