Sharad Pawar Group Candidate from Satara And Raver Announced: महाविकास आघाडीने जागा वाटपाचा 21-17-10 फॉर्म्युला गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच पुढील एक दोन दिवसांमध्ये उमेदवार घोषित न केलेल्या 3 जागांवरील उमेदवारांची करु असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानुसार आज सातारा आणि रावेर मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर  करण्यात आली आहे.


साताऱ्यातून उमेदवार जाहीर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातील संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुक लढवण्यास नकार दिल्यानंतर सातारा मतदारसंघातून कोण लढणार हा प्रश्न चांगलाच चर्चेत होता. भारतीय जनता पार्टीकडून उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याची चर्चा असून त्यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळेच तगडा उमेदवार देण्याचं आवाहन शरद पवार गटासमोर होतं. अखेर शरद पवार गटाने या जागेवरील उमेदवारी जाहीर केली असून शशिकांत शिंदे हे उमेदवार असणार आहेत. 


कोण आहेत शशिकांत शिंदे?


शशिकांत शिंदेंचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये त्यांचा चांगलाच राजकीय दबदबा आहे. ते 2009-2014 साठी कोरेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि निवडून आले. सध्या ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.


रावेरमधून मराठा कार्ड


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट निवडणूक लढवत असलेल्या रावेर मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक आहेत. मागील अनेक वर्षांपासून जे सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. श्रीराम पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार गटाने मराठा कार्ड खेळल्याची चर्चा आहे. रावेर मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या मतदारांचं वर्चस्व आहे. श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन कंपनीचे श्रीराम पाटील मालक असून सिका या इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनीचेही ते मालक आहेत. रावेर मतदारसंघामध्ये महायुतीकडून एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे अशी थेट लढत होणार आहे.


नक्की वाचा >> नव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जाहीर केलेली संपूर्ण यादी


वर्धा - अमर काळे
दिंडोरी- भास्करराव भगरे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
बारामती - सुप्रिया सुळे
अहमदनगर - निलेश लंके 
बीड- बजरंग सोनावणे
भिवंडी - सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे
सातारा - शशिकांत शिंदे
रावेर - श्रीराम पाटील



एकमेव मतदारसंघ शिल्लक


शरद पवार गट 10 जागा लढवणार असून त्यापैकी 9 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. केवळ माढा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. ही घोषणाही आगामी एक ते दोन दिवसात होईल असं सांगितलं जात आहे.