काँग्रेस की शिवसेना, आघाडीत कोण वाघ ? अतंर्गत संघर्षाचा निवडणुकीत बसणार फटका?, जाणून घ्या
Sabgli Election: सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचा संघर्ष वरकरणी संपलेला दिसत असला तरी सुप्तपणे सुरूच आहे.
Loksabha Election 2024: सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता टोकाला पोहचला आहे. आपणपण वाघ असल्याचं म्हणत कॉंग्रेसच्या विश्वजीतकदम यांनी थेट शिवसेनेला डीवचले. मग वाघ असल्याचं सिद्ध करून दाखवावं,असं थेट आव्हानच संजय राऊत यांनी विश्वजीत कदम यांना दिला आहे. आधीच महाराष्ट्रात कॉंग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. त्यात 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी कॉंग्रेस रिंगणात आहेत. महाविकास आघाडीसमोर महायुतीचं तगड आव्हान आहे. यातच महाविकास आघाडीचा संघर्ष कुठपर्यंत जाणार? असा प्रश्न विचारला जातो.
सांगलीची जागा कोणाची यावरून महाविकास आघाडीत चांगलीच धुसफूस झाली. काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्ली गाठली पण उद्धव ठाकरे,संजय राऊत यांनी थेट सांगलीत येऊन ठणकावत सांगलीची जागा आमचीच असे सांगितले. एवढेच नव्हे तर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आणि मग काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे असा संघर्ष पेटला.
शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातला हा संघर्ष स्थानिक पातळीवर आगदी उफाळून आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मग शिवसेनेच्या नेत्यांवर कार्टुनच्या माध्यमातून टीका करत विशाल पाटलांचा जाहीर प्रचार सुरू केला. विशाल पाटलांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसची भूमिका काय असणार? यावर प्रश्न निर्माण झाला.
काँग्रेस मेळाव्यात अगदी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेनेवर आग पाखड देखील केली, अगदी विश्वजीत कदम यांनी शिवसेनेचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आघाडी धर्म पाळायचा म्हणून काँग्रेसने चंद्रहार पाटलांचा प्रचार सुरू केला. विश्वजीत कदम यांनी चंद्रहार पाटलांच्या हातात हात घालून प्रचार रॅली काढत, चंद्रहार पाटलांच्या विजयाचा आश्वासन दिले.
असं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला विश्वजीत कदम यांच्या मनात अजूनही खदखद आहे. जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात असंतोष आहे. त्यामुळे काँग्रेस चंद्रहार पाटलांच्या प्रचारात अद्याप पूर्ण सक्रिय नाही. जिल्ह्यातली काँग्रेस विशाल पाटलांच्या मागे खंबीर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
शिवसेनेबद्दल असणारी खदखद विश्वजीत कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सांगलीतल्या सभेतून देखील बोलून दाखवली. आपण महाराष्ट्राचे वाघ असाल पण आम्हीही सांगलीचे वाघ आहोत, असं सूचक विधान विश्वजीत कदम यांनी केलं. तर विश्वजीत यांच्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील वाघाच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसेना ही सर्टिफाइड वाघ आहे आणि तुम्ही वाघ असाल तर चंद्रहार पाटलांना निवडून आणून दाखवा, तरच तुम्हाला वाघाची उपमा देऊ,असं आव्हान थेट संजय राऊत यांनी विश्वजीत कदम यांना दिलाय.
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचा संघर्ष वरकरणी संपलेला दिसत असला तरी सुप्तपणे सुरूच आहे. यानिमित्ताने तो आता पुन्हा एकदा उफाळून आलाय आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही,अशी चर्चा रंगली आहे.