Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी राहिला असून सर्वच पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपचा (BJP) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न असेल. तर मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी I.N.D.I.A.अशी नवी आघाडी तयार केली आहे. त्यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक चुरशीची होणार हे नक्की. महाराष्ट्रात तर लोकसभा निवडणुक जास्तच चुरशीची होणार आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटून दोन गट झाले आहेत. यापैकी एक गट भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती लोकसभा चुरशीची
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करुन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्याबरोबर पक्षातील अनेक आमदार-खासदार बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं जागा वाटपाचं समीकरण कसं असेल यावरुन चुरस रंगली आहे. यातही सर्वांचं लक्ष लागलं आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही सुप्रिया सुळे 70 हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. 


तर 2019 मध्ये बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार करत भाजपनं प्रचंड मोठी यंत्रणा कामाला लावत राष्ट्रवादीला पर्यायानं पवार कुटुंबाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली.  भाजप नेते अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत आदी नेत्यांच्या सभाही या मतदारसंघात घेण्यात आल्या. पण याचा फारसा फरक पडला नाही. सुप्रिया सुळे 1 लाख 54 हजार मतांनी त्यांनी भाजपाच्या कांचन कूल यांचा पराभव केला.


नणंद-भावजय आमने सामने
पण आता चित्र बदललंआहे. राष्ट्रवादीतच दोन गट झाल्याने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता वाढली आहे. यातच बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतक्रिया दिली आहे. दिल्लीत काय दडपशाही चालते हे सगळा देश बघतोय...आपल्याकडे लोकशाही आहे. आपण सगळ्यांनी याचा मान सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. तसंच माझ्याविरुद्ध कुणी ना कुणी लढणारच, त्यामुळे असं झालं तर या निर्णयाचं पूर्ण ताकदीने स्वागत केलं पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.


भाजपची बैठक
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत 3 ऑक्टोबरला होणार आहे. दादर वसंत स्मृती येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीवर, पक्षाचे धोरणात्मक कार्यक्रम आणि पक्ष संघटना बांधणीवर चर्चा होणार आहे.