LokSabha: बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, अजित पवारांचा निर्णय; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले `एकनाथ शिंदेंनी त्यांचा...`
LokSabha: बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असताना शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी जाहीर विरोध केला आहे. दरम्यान अजित पवारांनी बारामतीमधील उमेदवार बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
LokSabha: बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला आहे. यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. विजय शिवतारे यांनी काही झालं तरी माघार घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. वेळ पडल्यास आपण कमळाच्या चिन्हावर लढू असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान अजित पवारही बारामतीवर ठाम असून उमेदवार माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज पार पडली असून यावेळी लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.
आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली आहे. अजित पवारांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रायगडमधून सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर केली. दरम्यान बारामतीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी काही काळ सस्पेन्स ठेवतो असं मिश्किल भाष्य केलं. पण तुमच्या मनात आहे तोच उमेदवार असेल असंही सूचक विधान केलं. 28 मार्चला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेत सर्व जागांबद्दलचा निर्णय जाहीर करु अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, बारामतीचा उमेदवार बदलणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. विजय शिवतारे यांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असंही बैठकीत ते म्हणाले आहेत.
अजित पवारांनी यावेळी पाच टप्पे असून वेळ आहे त्याचा चांगला वापर करा अशी सूचना केली. सभांचं नियोजन करा आणि खोटा प्रचार रोखा असं त्यांनी सांगितलं. दरम्यान महाराष्ट्रात निवडणुकीची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल इतक्या जागा आम्ही मागितल्या आहेत असा दावा अजित पवारांनी केला आहे. मागे आम्ही 80 टक्के काम झाल्याचे सांगितलं होतं. आता 99 टक्के काम झालं आहे असा दावा अजित पवारांनी केला. स्टार प्रचारकांच्या याद्यादेखील जाहीर केल्या जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं. साताऱ्याबाबतचा निर्णय 28 तारखेला सांगू. उदयनराजे यांना भाजपाचे नेते समजून सांगतील असं अजित पवार म्हणाले. दरम्यान विजय शिवतारे यांच्या वक्तव्यांवर बोलण्यास त्यांनी नकार दिला.