बारामतीत येऊन जिंकून दाखवूच, गिरीश महाजनांचं पवारांना थेट आव्हान
`जगावर अधिराज्य गाजवून राज्य करण्यासाठी भारतात आलेल्या सिकंदरलाही भारतातून परत जावं लागलं होतं.
जळगाव : 'जगावर अधिराज्य गाजवून राज्य करण्यासाठी भारतात आलेल्या सिकंदरलाही भारतातून परत जावं लागलं होतं. त्यामुळे तुम्ही कोण आलात? बारामतीमध्ये येऊन बारामती जिंकून दाखवूच', असं थेट आव्हान भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पवारांना दिलं आहे. 'आजची परिस्थिती बदलली आहे. आजकाल कोणीच अमर नाही, त्यामुळे बारामती जिंकणंही फार अवघट नाही. भाजपच्या संघटन कौशल्यातून बारामती जिंकवून दाखवू', असं महाजन म्हणाले.
'उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा जिंकू'
'आपण जे ठरवतो, तेच आपण करतो त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठच्या आठ जागा मोठ्या मताधिक्क्यानं जिंकून आणू,' असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसंच विद्यमान खासदारांनी कामात कुचराई करू नये, असा सूचक इशाराही गिरीश महाजन यांनी खासदार ए.टी.पाटील आणि रक्षा खडसे यांना पाहून दिला. जळगावमध्ये भाजपचं शक्ती केंद्र प्रमुखांचं संमेलन पार पडलं, त्यावेळी महाजन बोलत होते.
गिरीश महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जंगलातील सिंहाची उपमा दिली आणि महागठबंधनमधील नेत्यांवर टीका केली. सिंहाला पराभूत करण्यासाठी जंगलातील हत्ती, घोडे, उंट, कुत्रे, मांजरी, माकडं सगळीच एकत्र येत आहेत. पण सिंहाला कोणीही पराभूत करू शकणार नाही, कारण मुकाबला मोदींशी असल्याचं वक्तव्य महाजन यांनी केलं.