जर महायुतीसोबत चर्चा फिस्कटली तर? बाळा नांदगावकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले `राज ठाकरे स्वबळावर...`
LokSabha: मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? याबाबत अद्यापही कोणता अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान आम्ही महायुतीकडे 3 जागांची मागणी केली होती आणि सध्या 2 जागांवर चर्चा सुरु आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
LokSabha: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊन 10 दिवस झाले असले तरी महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. भाजपा-शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात अजूनही पूर्णपणे सहमती झालेली नसून जागांवरुन एकमत झालं नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यात मनसे सहभागी होत असल्याने त्यांना नेमक्या किती आणि कुठल्या जागा द्यायचा याबद्दलही निर्णय झालेला नाही. आम्ही महायुतीकडे 3 जागांची मागणी केली होती आणि सध्या 2 जागांवर चर्चा सुरु आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
शिवतीर्थवर बुधवारी मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 9 मार्चला गुढीपाडव्याचा मेळावा होणार असून त्यासंदर्भात आज चर्चा झाली. शाखा अध्यक्षांच्या सूचना आणि शंका यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
बाळा नांदगावकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रश्नांवर बोलताना यावेळी सांगितलं की, "राजकारणात संयम आणि धैर्य असतो तोच पुढे जातो. थोडा संयम ठेवल्यानंतर सर्व प्रश्नांची उतरं मिळतील". मनसे शिवसेनेत सहभागी होणार असून, राज ठाकरे नेतृत्व करणार असल्याच्या प्रस्तावाचीही चर्चा सुरु आहे. त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, "माध्यमांमध्ये हे वृत्त आलं. आम्हाला त्याची कल्पना नाही. यासंदर्भात चर्चा झाली असेल तर संबंधित पक्षप्रमुखांना याची माहिती असावी. आमच्याशी यासंदर्भात चर्चा झालेली नाही".
"आम्ही 3 जागा मागितल्या होत्या. 3 जागांवर चर्चा सुरु होती. आता 2 जागांवर चर्चा सुरु आहे. यावर राज ठाकरे आणि महायुती निर्णय घेतील," अशी माहिती बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. दरम्यान हे 2 मतदारसंघ कोणते आहेत याची माहिती देण्यास बाळा नांदगावकर यांनी नकार दिला.
आम्ही मागील वेळीही लोकसभा निवडणूक लढलो आहोत असं ते म्हणाले. जर मनसेची महायुतीशी चर्चा फिस्कटली तर पुढे काय असं विचारण्यात आलं असता बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, "स्वबळावर लढण्यासंबंधी राज ठाकरे निर्णय घेतील. आमच्या स्वबळावर लढण्याचा अनुभव तर सर्वांना माहिती आहे".