मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर(Lonar lake in Buldhana district) एका विशिष्ट प्रकारात मोडत असलेले हे लोणार सरोवर आशिया खंडातील पहिले आणि जागतिक स्तरावरील तिसरे सरोवर आहे. सरोवर राज्यातील सात आश्चर्यांपैकी मानले जाते. या एकाच सरोवरात खाऱ्या आणि गोड पाण्याचे प्रवाह आहेत. सध्या सरोवराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले. यामुळे या जगप्रसिद्ध लोणार सरोवर मोठा धोका निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रतील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ(Maharashtra Tourism ) असून पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सततच्या पावसामुळं बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालीय. त्यामुळं सरोवराला मोठा धोका निर्माण झालाय. याठिकाणची सासू सुनेची विहीर सुद्धा पाण्यामुळं दिसेनाशी झालीय. तर आजूबाजूला असलेली जुनी मंदिरे देखील पाण्याखाली जाण्याची भीती आहे. तसचं इथे असलेल्या पाच झ-यांचे पाणी सरोवराला मिळत असल्यानं पाण्याची पातळीत प्रचंड वाढ झालीये. जर ही पाणी पातळी अशीच वाढत राहिली तर जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे.


उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली होती.  लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे.  याचे पाणी अल्क धर्मी असून या सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.  सुरुवातीला पाण्यात विशिष्ट प्रकारच्या हॅलो बॅक्टेरिया व शेवाळ्याच्या संयोगातून सरोवरचे पाणी गुलाबी देखील झाले होते.


अशी आहे लोणार सरोवरा मागची कहानी


सरोवरातील सासु सुनेची विहीर प्रसिद्ध आहे, विहिरीतील एकिकडचे पाणी गोड तर दुसरीकडचे खारट आहे. पौराणिक आख्यायिका नुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले त्याच्या नावावरूनच या सरोवरास हे नाव मिळाले असे सांगितले जाते. सरोवराच्या वयाबद्दल मतांतरे आहेत एका पद्धतीनुसार सरोवर 52000 वर्ष जून आहे परंतु आजच्या काळात सर्वात अचूक मानल्या जाणाऱ्या ऑर्गन डेटिंग नुसार सरोवराची निर्मिती सुमारे पाच लाख 70 हजार वर्षांपूर्वी झाले असल्याचे सांगितले जाते.  पद्मपुराण स्कंदपुराणांमध्ये देखील लोणार सरोवराचा उल्लेख आढळतो तसेच आईना- ए -अकबरी सह अनेक प्राचीन ग्रंथात या सरोवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख विराजत तीर्थ किंवा बैरजतीर्थ असा देखील केला जातो.


ब्रिटिश अधिकारी जे इ अलेक्झांडर यांनी सन 1823 मध्ये या सरोवराची नोंद केली सरोवराच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत त्यातील 15 मंदिरे ही विवरातच आहेत. प्रसिद्ध कमळजा मातेच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. अलीकडेच सरोवराला wet land अर्थातच रामसर पाणथळ प्रदेश म्हणून देखील घोषित करण्यात आले आहे.


लोणार सरोवराची पातळी 2017 ते 19 पर्यंत खूप खालावली होती यामुळे सरोवरातील सासु सुनेची विहीर देखील उघडी पडली होती मात्र यानंतर 2020- 21- 22 या दरम्यान खूप मोठा पाऊस झाल्याने सर्वांतील पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे मात्र वाढत चाललेली पातळी ही धोकादायक असून येथील जैवविविधतेला याचा फटका बसणार असल्याचं अभ्यासक सांगतात.


रामसर दर्जा मिळाल्यानंतर लोणार सरोवराचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे, सरकारला याकडे विशेष लक्ष देणं देखील गरजेचे आहे. शहरातील सांडपाणी सरोवरात जाऊ नये यासाठी देखील प्रशासनाने प्रयत्न केलेत मात्र पाण्याची वाढणारी पातळी खूप काही सांगून जाते.. सरोवर आणि येथील जैवविविधता वाचवण्यासाठी कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात कृती गरजेची आहे.