अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील या आंदोलनाचा आजचा आकरावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांसह आपला मोर्चा मध्यप्रदेशच्या दिशेने वळवला. परंतू मध्यप्रदेश मधील भाजप सरकारकडून दुसऱ्याच दिवशी बैतुल मध्ये आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शनिवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी व्यवस्था केलेल्या मंगल कार्यायात राहायला पोलिसांनी नकार दिला.  त्यामुळे शेतकऱ्यांनावर वेअर हाऊसमध्ये राहण्याची वेळ आल्याचं बच्चू कडू यांनी सांगितले. भाजप सरकारने अशाच प्रकारे आमचे आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केल्यास कृषी मंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा ईशारा बच्चू कडू यांनी भाजप सरकारला दिला आहे.


राज्यमंत्री बच्चू कडू हे शुक्रवार पासून दिल्ली आंदोलनासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन निघाले आहेत. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे पहिला मुक्काम झाल्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश मध्ये प्रवेश केला आहे. 


यासाठी बैतुल मध्ये एक मंगल कार्यलय बुक करण्यात आले होते. पण ऐन वेळेवर मध्यप्रदेश पोलिसांनी रहायला नकार दिल्याने हजारो शेतकऱ्यांनी वेअरहाऊसमध्ये रात्र जागून काढली. आज सकाळी बच्चू कडू हे हजारो शेतकऱ्यासह पुढच्या प्रवासाला रवाना होणार आहेत.