-तुषार तपासे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Mahabaleshwar Health Issues & Horse Connection: थंडीच्या दिवसातच नाही तर 12 महिने महाराष्ट्रातील पर्यटकांबरोबरच देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या महाबळेश्वरमध्ये एक अजब संकट समोर आलं आहे. येथील वेण्णा तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या घोडे सफारीमुळे वेण्णा तलावात घोड्यांची विष्ठा जात असल्याने महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे.


कोणी केला अभ्यास?


पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि सायन्सने परीक्षण केलेल्या अहवालातून ही धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या भागातील घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफाइड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांमध्ये या आजारांचं प्रमाण वाढल्याचंही या संशोधनामध्ये स्पष्ट झालं आहे.


कोणते विषाणू आढळून आले


महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक हे वेण्णा लेक भागात घोडे सफरीचा आनंद घेत असतात. मात्र, या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी भागात एक समस्या निर्माण झाली आहे. महाबळेश्वर,पाचगणी भागाला याच वेण्णा तलावातून पाणीपुरवठा होतो. मात्र आता या तलावासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तलावातील पाण्यात ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म बॅक्टेरियासारखे संसर्गजन्य विषाणू सापडल्याचे समोर आले आहे.


कोणता त्रास होतो?


ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म यासारख्या विषाणूंमुळे येथील स्थानिक नागरिकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग असं आजार होत आहेत. घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळत असल्याने या भागातील नागरिकांना पोटांसंदर्भातील गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलं आहे. या अहवालाला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दुजोरा दिला आहे. 


जिल्हाधिकारी काय म्हणाले?


"वेण्णा तलावातील पाण्यात ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म बॅक्टेरियासारखे संसर्गजन्य विषाणू सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून पोटासंदर्भातील रोगांमध्ये वाढ दिसत आहे," असं जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी म्हटलं आहे.


प्राण्यांच्या माध्यमातून रोगप्रसार


प्राण्यांच्या माध्यमातून रोगप्रसार तशी फार सामान्य बाब आहे. बर्ल्ड फ्लू, कोरोना, स्वाइन फ्लू यासारख्या गोष्टींचा फैलाव प्राण्यांमधून माणसांना होतो. थेट प्राण्यांशी संपर्क येणे, प्राण्यांच्या विष्ठेतील अंश जलसाठ्यांच्या माध्यमातून पसरणे यासारख्या गोष्टींमधून आजारांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. सध्या महाबळेश्वरमध्ये असाच प्रकार घडला आहे.


घोड्यांच्या विष्ठेमुळे होणारे आजार


> अतिसार 
> श्वसनाचा संसर्ग
> टाइफाइड
> पोटविकार
> लहान मुलांमध्ये रोटा व्हायरस
> बुरशीजन्य संसर्ग