महादेव जानकर यांनी तळले वडे, सदाभाऊ खोत यांनी मारला भाकरी-ठेच्यावर ताव
सोलापूर जिल्ह्यातील पंचायतराज समितीच्या दौऱ्यात अनेक किस्से पाहायला मिळतायत
अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : पंचायतराज समितीचे सदस्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी एका गावात चक्क बटाटे वडे तळल्याचे पहायला मिळालं. अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये बचत गटाच्या महिलांकडून हॉटेल चालवले जाते. त्यावेळी तिथे एक आजी वडे तळत होती. हे पाहून महादेव जानकर यांनी त्यांच्या हातातील झारी घेऊन बटाटे वडे तळण्याचा प्रयत्न केला.
यावेळी या समितीचे सदस्य असलेल्या महादेव जानकर यांच्यासह आमदार विक्रम काळे, अंबादास दानवे हेदेखील त्यावेळी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी महादेव जानकर हे वडे तळत असताना, "महादेव जानकर यांच्या वडे तळण्याची वेळ." अशी हेडलाईन होईल असा चिमटा काढला. त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.
सोलापूर जिल्ह्यात आलेल्या पंचायतराज समितीच्या दौऱ्यात अनेक मजेदार किस्से पाहायला मिळतायत. एकीकडे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अडवून पैसे मागणाऱ्या हॉटेल चालकाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असताना दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांचा हा वडे तळतानाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला.
सदाभाऊ खोत यांचा नवा व्हिडिओ व्हायरल
त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सदाभाऊ एका थ्री स्टार हॉटेलमध्ये बसून कार्यकर्त्याच्या शिदोरीवर ताव हाणताना दिसत आहेत.
सदाभाऊ खोत सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी दुपारच्या जेवणासाठी ते सोलापूरमधल्या एका थ्री स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. इथे त्यांनी हॉटेलमधले पदार्थ न मागवता कार्यकर्त्यांच्या डब्यातलं जेवण खाणं पसंत केलं. ज्वारीची भाकरी, शेंगाची चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेच्याचा त्यांनी आस्वाद घेतला.