धुळे : तीन दिवसांच्या माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. खान्देशात गौरीला महालक्ष्मी नावानं संबोधलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी स्वागत, नंतर सुग्रास भोजन त्यानंतर आता महालक्ष्मीला निरोप देण्याची लगबग, खान्देशात सुरु झाली आहे. 


साजशृंगारानं नटलेल्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी बाहेरगावी राहणारी सर्व मंडळी खान्देशातल्या आपल्या गावांकडे परतली आहेत. 


अत्यंत सुंदर चेहरा असलेल्या महालक्ष्मी जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये दिसून येतात. अनेक कुटुंबांमध्ये तर महालक्ष्मी पूजनाची १०० वर्षांहून अधिकची परंपरा आहे.


 खान्देशात जेष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन महालक्ष्मीच्या मनमोहक प्रतिकृती तयार केल्या जातात. त्यासोबत एक बाळ असतं. सोबत गणपती बाप्पाही विराजमान असतात. 


ज्या ठिकाणी महालक्ष्मी बसवल्या जातात त्याठिकाणी आजूबाजूला सुंदर आरास केली जाते. शिवाय आकर्षक रोषणाईही असते. 


या सर्व उत्सवात महिला आणि प्रामुख्याने मुलींचा विशेष सहभाग असतो. महालक्ष्मीची उंची साधारण दोन ते तीन फुटांपर्यंत असते. 


खान्देशात महालक्ष्मीचे मुखवटे  प्रामुख्याने पितळी चमकदार असतात. यात आता पाढं-या रंगाचे, नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले, सोनं अथवा चांदीचे बनवलेले मुखवटेही प्रचलित आहेत. 


महालक्ष्मींना पुरणपोळीचा खास नैवेद्य दिला जातो. सोबतच विविध १६ प्रकारच्या पालेभाज्यांचाही नैवैद्य दाखवला जातो. तर महालक्ष्मींच्या जेवणानंतर खास गोविंद विडाही ठेवला जातो.