अंगात साप येतो, जमिनीवर सरपटतो! नागपूरात सर्पदंशावर अघोरी उपाय करणाऱ्या भोंदुबाबाचा पर्दाफाश
भारताने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगीत केली आहे. पण देशातल्या खेड्यापाड्यापर्यंत हे तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा पोहाचल्या कि नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कारण आजही आजारपणावर तांत्रिक किंवा भोंदूबाबाकडू उपचार करुन घेतले जातात.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : भारताने तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. नुकतंच भारतीय शास्त्रज्ञांनी (Indian Scientists) तयार केलेला चांद्रयान-3 (Chandrayan-3) उपग्रह अवकाशात सोडला. काही दिवसातच तो चंद्रावर स्थिरावेल आणि जगाला त्याचा फायदा होईल. तंत्रज्ञान असो कि वैद्यकिय, भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. जगभरातील रुग्ण अवघड शस्त्रक्रियेसाठी भारतात येतात. भारतीय वैद्यकीय क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. पण एकीकडे चंद्रावर जात असताना, वैद्यकिय क्षेत्रात भरारी घेत असताना दुसरीकडे आपल्या देशात एक वर्ग असा आहे जो अजूनही अंधश्रधेच्या जोखाड्यात अडकून पडलाय. मुल होत नाही, आजारी मुलावर उचारासाठी आजही खेडोपाड्यात डॉक्टरकडे नेण्याऐवजी तांत्रिक किंवा भोंदूबाबाकडे (Bhandubaba) नेलं जातं. असाच एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे.
साप चावल्यावर भोंदूबाबाकडे
राज्याची उपराजधानी असलेल्या नगापूरपासून (Nagpur) अवघ्य 60 किलोमीटर अंतरावर रामटेक तालुक्यातील कट्टा गावात अंधश्रद्धेचा (Superstition) पर्दाफाश करण्यात आला आहे. नागपूरच्या वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हा अघोरी प्रकार उघडीस आणला आहे. पावसाळा सुरू झाला की सर्पदंशच्या अनेक घटना घडतात. रामटेक तालुक्यातील काही भागात साप चावलेल्या व्यक्तीला गावातील भोंदू बाबांकडे नेलं जातं. हे भोंदूबाबा सापाचं विष उतरवतात असा भोळ्याभाबड्या लोकांचा समज आहे. विशेष म्हणजे एकाद्या व्यक्तीला चावलेला साप म्हणे यांच्या अंगात येतो.
साप चावलेल्या व्यक्तीला या भोंदूबाबांकडे नेल्यावर सुरुवातीला हे भोंदूबाबा मंत्र-तंत्र करत तो साप आता आपल्या अंगात आल्याचा दावा करतात. त्यानंतर त्या सापासारखा हिस...हिस आवाज करत चक्क जमिनीवर सरपटतात. त्यानंतर हा भोंदूबाबा सरपटत साप चावलेल्या व्यक्तीकडे जातो आणि त्याच्या पायातून विष शोषून घेतो. यावेळी बाबाचे चेले मंत्र आणि बाऱ्या म्हणतात. विशेष म्हणजे इकडे एक भोंदूबाब नाहीए. कोणत्या जातीचा साप आहे त्याप्रमाणे वेगवेगळे भोंदू बाबा आहेत.
भोंदूबाबाचा पर्दाफाश
नागपूरमधल्या वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीने या भोंदूबाबांचा पर्दाफाश केला आहे. वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या नितीश भांदस्कर यांनी एका तरुण सहकाऱ्याच्या हाताला पिन टोचली. सर्पदंश होतो त्यावेळी शरीरावर जशी खूण उमटेत त्याप्रमाणे ही खूण करण्यात आली. त्यानंतर त्या तरुणाला सर्पदंश झाल्याचं सांगत भोंदूबाबकडे घेऊन जाण्यात आलं. भोंदूबाबाने उपचार सुरु केले. साप आल्याचं सांगत त्याने जमिनीवर त्या सापाप्रमाणे सरपटण्याचं नाटक केलं. त्यानंतर त्या तरुणाकडे जाऊन त्या भोंदूबाबाने विषारी रक्त शोषण्याचं नाटक केलं.
हा सर्व प्रकार वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या लोकांनी कॅमेरात कैद केला. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार देण्यात आली आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी पोलिसांनी तसंच दक्षता अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी केलीय. कायद्यानुसार हा प्रकार गुन्हा ठरत असल्याच सांगत शिक्षेची तरतूद आहे. जिल्हाधिकारींनी या प्रकरणांमध्ये बैठक घेत अशा पद्धतीने अघोरीवृत्त होऊ नये यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती प्रचार प्रसार करण्याच्या सूचना दिल्याचेही देशमुख यांनी सांगितलं