Maharashtara News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2 जुलै रोजी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात बंड पुकारत थेट महायुतीच्या (Mahayuti) सत्तेत सहभाग घेतला होता. त्यानंतर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले आहेत. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाने कार्यालयापासून ते ट्वीटर अकाऊंटपर्यंत वेगळी भूमिका घेण्यासा सुरुवात केली आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं एक्स हँडल (पूर्वीचे ट्वीटर) सस्पेंड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपासून हे ट्विटर हँडल सस्पेंड असल्याचा मेसेज या ट्विटर हँडलवर दिसतो आहे. शरद पवार गटाने या ट्विटर हँडलच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ट्विटरकडून ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NCPSpeaks शरद पवार गटाचं अधिकृत ट्विटर हँडल आहे. तर NCPSpeaks1 या नावाने अजित पवार गटाने ट्विटर हँडल सुरू केलं होतं. मात्र ते आता सस्पेंड करण्यात आलं आहे. अजित पवार गटाने नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरने सांगितलं आहे. ट्विटर अकाऊंट सस्पेंडेड असा मेसेज या ट्विटर अकाऊंटवर दिसत आहे.



एकच नावाचं अकाऊंट असल्याने शरद पवार गटाने याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर अजित पवार गटाचं ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आलं आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून आपलं म्हणणं ट्विटरला कळवलं असून हे ट्विटर हॅण्डल आज सुरु होईल, अशी माहिती अजित पवार गटाकडून देण्यात आली.


दरम्यान, बंडानंतर अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. पक्षाच्या बैठकीत आपली अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला सादर केले होते. अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर दावा करत घड्याळ पक्ष चिन्ह मिळावे म्हणून निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजावून त्यात अजित पवार यांच्या दाव्यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले होते.


त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही, काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्यासह 12 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनी केलेला दावा चुकीचा आहे, असा प्रत्युत्तर शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे देण्यात आले होते.