75 percent attendance is compulsory for class 10th and 12th students : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. यावर्षीच्या परीक्षांसाठी हा निर्णय नव्हता पण आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75  टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना हे आदेश जारी करण्यात आले आहे. पुढील वर्षी अर्थात 21 फेब्रुवारी 2023 पासून बारावीच्या तर 2 मार्च 2023पासून दहावीच्या परीक्षा सुरु होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.


दरम्यान, याआधी सीबीएसईकडून विद्यार्थ्यांची उपस्थितीबाबत निर्णय घेतला होता. 75  टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. सीबीएसईने देशभरातील शाळांना 18 जुलैला परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के  उपस्थिती असण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. आता सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.