मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये मजूर अडकले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. एका दिवसात एसटीच्या माध्यमातून ८ हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ता आणि रेल्वे रुळांच्यामार्गे मजूर पायपीट करत चालले आहेत. औरंगाबादच्या रेल्वे रुळ दुर्घटनेनंतर याचे गांभीर्य प्रखरतेने समोर आले. राज्य शासनाने यासाठी महत्वाची पाऊले उचलत मजुरांना मोफत एसटी प्रवास देण्याची घोषणा केली. रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे ५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले. 


हे वाचा : १२ मेपासून निवडक रेल्वेगाड्या सामान्य प्रवासी वाहतुकीसाठी सुरू



नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे २५० एसटी बसेस द्वारे सुखरुप प्रवास झाला. तसेच परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील सुमारे ३ हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छीत जिल्हा ठिकाणी आणण्यात आले. अशा प्रकारे आज दिवसभरात सुमारे ८ हजार मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप सोडण्यात आले. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी यासंदर्भात माहिती दिली. 


मजुरांना इच्छित स्थळी सोडत असताना आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. मजुरांनी यासाठी एसटी महामंडळ आणि राज्य शासनाचे आभार मानले.


लॉकडाऊन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजूरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे आणि तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील मजुरांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले. 


तरी कष्टकरी कामगार-मजूरांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र राबत असलेल्या एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.