या गावात ७० वर्षांनंतर पोहोचली वीज
महाराष्ट्रातील एक असं गाव आहे जेथील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी वीज पोहोचली आहे.
गडचिरोली : महाराष्ट्रातील एक असं गाव आहे जेथील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी वीज पोहोचली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अमदेली गावाची लोकसंख्या जवळपास २०० आहे. हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगानाच्या सिमेवर आहे. दुर्गम व चहुबाजूंनी जंगलाने वेढलेलं असं हे गाव आहे. काही दिवसांपूर्वी गावात परिवहन सेवाही नव्हती. पण आता गावात वीज आणि परिवहन सेवा दोन्ही सुरु झाल्या आहेत.
अमदेली गावात प्रथमच वीज पोहोचल्यानंतर संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकाच्या घरात दिवे लागले आणि चेहऱ्यावर हसू फूललं.
गावात वीज पूरवठा व्हावा यासाठी ४५ लाख रुपयांची व्यवस्था जिल्हा परिषदेने केली. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपलं काम सुरु केलं. अतिदुर्गम व आदिवासीबहुल अशा गावात वीज पूरवठा पोहोचवण्यासाठी महावितरणने काम सुरु केलं. त्यानंतर गावात वीज पोहोचली.