मुंबई : विधानसभा २०१९ ची निवडणूक अनेक अर्थांने वेगळी ठरली. अनेक तरुण आमदार मतदारांनी विधानसभेत पाठवले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या आयारामांना जनतेने घरी बसवले. मतदारांना गृहीत धरणाऱ्यांनाही चांगलाच दणका बसला. युती सरकारला जनतेने कौल दिला असून आता मुख्यमंत्री कोणाचा याबाबत चर्चा सुरु आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा सरकार येण्यात सोशल मीडियाचा मोठा हात होता. तरुण वर्ग सोशल मीडियावर जास्त असल्याने तिथेही प्रचार पाहायला मिळाला. त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपला सोशल मीडिया मजबूत केला. त्यामुळे यावेळची निवडणूक या कारणासाठीही खास ठरली. ट्विटरवर विधानसभेचा रणसंग्राम पाहायला मिळत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजमाध्यमांची भुरळ अख्ख्या जगालाच पडली आहे. मात्र ऐन मतदान ते मतमोजणी दरम्यान लाखो ट्विट्स केले गेले. २१ ऑक्टोबरला झालेलं मतदान ते २४ ऑक्टोबरला झालेली मतमोजणी, या ४ दिवसांच्या काळात तब्बल ३२ लाख ट्विट्स केले गेले. 



यापैकी निकालाच्या दिवशी सर्वाधिक ट्विट्स करण्यात आले. ट्विटर इंडिया या अधिकृत अकाऊंटवरुनही ट्विटनं ही माहिती दिली आहे.


तिघांचा बोलबाला 


या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत वेगळा आदर्श समोर ठेवला. पक्षातील महत्त्वाचे नेते सोडून गेल्यानंतर नव्या उमेदवारांना संधी देत त्यांना जिंकवण्याची किमया शरद पवारांनी करुन दाखवली. ट्विटरवर शरद पवारांच्या नावाची चर्चा राहीली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. यांच्या नावानेही ट्विटरवर अनेक ट्विट्स पाहायला मिळाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ट्विटरवर अधिक सक्रिय असतात. मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणारे आदित्य ठाकरे यांच्याबाबत सर्वाधिक ट्विट्स करण्यात आले होते.