`अमित शाह शिवसेनेची समजूत काढणार का ?`
अमित शाह आता ३० ऑक्टोबरला मुंबईत येणार असल्य़ानं ते शिवसेनेची समजूत काढतात का हे पाहावं लागेल.
अमर काणेसह देवेंद्र कोल्हटकर झी २४ तास मुंबई : अवघ्या ५६ जागांच्या जोरावर शिवसेना राज्यातल्या सत्तेत निम्मा वाटा मागायला लागली आहे. सत्तेचा रिमोट कंट्रोल शिवसेनेच्याच हाती आहे असा दावाही केला जाऊ लागलाय. त्यातच अमित शाह आता ३० ऑक्टोबरला मुंबईत येणार असल्य़ानं ते शिवसेनेची समजूत काढतात का हे पाहावं लागेल.
शिवसेना फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर अडून बसलीय. गाठीला ५६ जागा असतानाही शिवसेनेनं सत्तेच अर्धा वाटा मागायला सुरुवात केलीय. काँग्रेस राष्ट्रवादीनं सुरुवातीला शिवसेनेच्या शिडात हवा भरली पण त्यानंतर त्यांनी विरोधातच बसणार असल्याचं सांगून हात वर केलेत. त्यामुळं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर इशारा देण्यापुरतीच मर्यादित राहिलीय. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ३० ऑक्टोबरला मुंबईत येणार असून ते मातोश्रीवर जाण्याची शक्यता असल्याचं प्रदेश भाजपाकडून सांगण्यात आलंय.
शिवसेनेनं सामनातून भाजपावर टीका करण्यास सुरुवात केलीय. २०१४साली स्वतंत्र लढूनही भाजपानं १२२ शिवसेनेनं ६३ जागा जिंकल्या. यावेळी स्वतःकडे सत्ता, युतीचं पाठबळ असूनही शिवसेना ५६ वर थांबली. हा आकडा लहान वाटत असला तरी सत्तेचा रिमोट उद्धव ठाकरेंच्या हाती आला आहे. आयारामांचा जो बाजार भरवला तो शेअर बाजारासारखा कोसळला. १०६ जागा जिंकूनही भाजपाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. असं शिवसेनेनं सामनात म्हटलंय. अमित शाह भेटीला येणार असतील तर ते कळेल असंही संजय राऊतांनी म्हटलंय.
शिवसेनेचा रिमोट त्यांच्याच खिशात ठेऊन मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्याची भाजपाची रणनिती आहे. अमित शाहांची अशीच रणनिती असावी. त्यामुळं येत्या ३० तारखेलाच शिवसेना शांत होईल असा आत्मविश्वास भाजपात निर्माण झाल्याचं चित्र आहे.