पालघरमधून श्रीनिवास वनगा, या आमदाराचा अखेरचा `जय महाराष्ट्र`
पालघरमध्ये जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. शिवसेनेला येथे जोरदार धक्का बसला आहे.
मुंबई : पालघरमध्ये जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. शिवसेनेला येथे जोरदार धक्का बसला आहे. पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषीत करण्यात आली होती. मात्र, लोकसभेत युती झाल्याने भाजपचा उमेदवार शिवसेनेत घेत राजेंद्र गावित यांना लोकसभेवर पाठविण्यात आले. त्यानंतर वनगा नाराज होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द विधानसभेची उमेदवारी देऊन पूर्ण केला.
पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. श्रीनिवास वनगा यांना एबी फाँर्म देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी श्रीनिवास वनगांना थांबवून राजेंद्र गावितांना तिकीट देण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वनगा यांना विधानसभेचे तिकीट देण्याची ग्वाही दिली होती. दरम्यान, शिवसेनेकडून वनगा यांना उमेदवारी मिळाल्याने विद्यमान आमदार अमित घोडा नाराज झालेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पालघरमध्ये चूरस पाहायला मिळणार आहे. अमित घोडा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली तर शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरु शकते.
पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. आता विद्यमान आमदार अमित घोडा यांनी पक्षाचा त्याग केला आहे. तर पालघर जिल्हा परिषदचे शिवसेना गट नेता प्रकाश निकम यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. विक्रमगड मतदार संघातून प्रकाश निकम २०१४ मध्ये शिवसेनेकडून लढले होते. त्यांनी भाजपचे विष्णू सावरा यांना कडवी झुंज दिली होती. यावेळी ते पुन्हा विक्रमगड मतदार संघातून इच्छुक होते. मात्र हा मतदार संघ भाजपकडे गेल्याने ते नाराज झालेत. शिवसेनेचा येथे दावा असताना हा मतदार भाजपला सोडला गेल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकला आहे.