पुणे : कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत तो खालसा केला. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा ग्रामीण भागात जोरदार पुनरागमन करत २१ पैकी १० जागी विजय मिळवला. तर काँग्रेसने ही दोन जागा मिळवत अस्तित्व टिकवले..सेनेला मात्र जिल्ह्यात एक ही जागा मिळाली नाही तर शहरी भागाने साथ दिल्यामुळे भाजपला ९ जागा जिंकत लाज राखता आली...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांचा जिल्हा म्हणून पुण्यामध्ये काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. पण शरद पवार यांनी आता पर्यांतचा अनुभव पणाला लावत निवडणूक हातात घेतली आणि त्याला अजित पवार, अमोल कोल्हे यांची साथ मिळाल्याने पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले.. जिल्ह्यातल्या शहरी भागात भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकेल असा दावा भाजपने सुरुवाती पासून केला. पुणे शहरातील ८, पिंपरी चिंचवड मधल्या ३ आणि मावळ या सर्वच जागा जिंकू असा दावा भाजपने केला होता. पण पुणे शहरात हडपसर आणि वडगाव शेरी या दोन मतदार संघात राष्ट्रवादीने विजय मिळवला. 



पिंपरी आणि मावळ मध्ये ही  राष्ट्रवादीने मुसंडी मारली. मावळ मध्ये तर राज्यमंत्री बाळा भेगडे यांना सुनील शेळके यांनी ९० हजाराहून अधिक मतांनी पराभूत केले. पुणे शहरातल्या कसबा आणि पर्वती मतदार संघात भाजपला सन्मानजनक विजय मिळवता आला. पण ज्या कोथरूड मध्ये दीड लाख मताधिक्य घेऊ असा दावा भाजप करत होते, त्यात चंद्र्कां पाटील यांना अवघ्या २५ हजाराच्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले.


सक्षम पर्याय असता तर कदाचित पाटील यांना पराभवही पाहावा लागला असता. खडकवासाला मध्ये राष्ट्रवादी पराभूत झाली असली तरी अवघ्या २१०० मतांनी भाजपला विजय मिळवता आला. शिवाजीनगर मध्ये तर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांचा अक्षरशः घाम काढला. कॅन्टोन्मेंट मतदार संघात ही काँग्रेसचे रमेश बागवे पराभूत झाले असले तरी सुनील कांबळे यांचा विजय वंचित आघाडीने मते खाल्यामुळे झाला. एकूणच शहरी भागातल्या मतदारांना गृहीत धरणाऱ्या भाजपला मतदारांनी त्यांची जागा दाखवली.


पुणे जिल्ह्यातल्या शिरूर पट्ट्यात येणाऱ्या ग्रामीण मतदारसंघात ही राष्ट्रवादीने जोरदार वापसी केली. शिरूर पट्ट्यातल्या शिरूर सह, आंबेगाव, खेड, जुन्नर या चार ही मतदार संघात राष्ट्रवादीने विजय मिळवला. विशेष म्हणजे या सर्व मतदार संघात चुरशीची लढत ही पाहायला मिळाली नाही. सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना या ठिकाणी चांगलाच फटका बसला. या भागाचे लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमोल कोल्हे यांचा करिष्मा कायम असल्याचे ही या निवडणूकातून स्पष्ट झाले.